पुणे : ‘ जिंदगी हसीन है तो इश्क़ सुकून है’ असं म्हणत अनहद सोशल फाऊंडेशन चा “राईट टू लव्ह – प्रेमोत्सव-२०२४” उत्साहात साजरा करण्यात आला. लाल रंगाचे फुगे, ट्रम्पेट वर वाजणारी मराठी हिंदी चित्रपटातील सुरेल प्रेम गीते, प्रेम कविता, प्रेमाची गाणी यामुळे प्रेमोत्सवात रंगत आली. गजबजलेल्या जे. एम. रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर शेजारी सुट्टीच्या दिवशी अनेक तरुण तरुणींनी कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम अनहद सोशल फाऊंडेशन आयोजित मानस संस्था आणि परभन्ना फाऊंडेशनच्या सहयोगाने पार पडला.
यावेळी प्रेम कवितांची मैफिल चांगलीच रंगली होती. कवी प्रा. सुमित गुणवंत, हृद्यमानव अशोक, जितेश सोनावणे, प्रगत पडघन आदींनी आदर्श आणि समानतेच्या कविता सादर केल्या तर प्रवीण खुंटे आणि मिलींद दामोदरे यांनी प्रेम गीते सादर करून कार्यक्रम बघणाऱ्या लोकांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवले.
यावेळी गुलाब फुलांच्या बदाम आकारात फोटो काढण्यासाठी (सेल्फी पॉइंट) लावण्यात आलेल्या बॅनर ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या बदामात मोठ्या अक्षरात ‘सुकून है’ लिहिलेलं होतं तर त्या खाली ” कवी, राहुल सिद्धार्थ साळवे यांच्या “एखाद्याचे सोबत असणे जगणे वाटू लागावे याहून वेगळे प्रेम नसते काही” या ओळी होत्या. त्यामुळे या बॅनरजवळ शेकडो जोडप्यांनी, तरुण तरुणींनी फोटो आणि सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.
व्हॅलेंटाईन डे आधीच तीन दिवस आधीच रंगलेल्या या प्रेमोत्सव कार्यक्रमाचे सगळ्यांनाच कुतुहूल होते. त्यामुळे गजबजलेल्या जे. एम. रोडवर येणा जाणाऱ्यांनी यावेळी व्हॅलेंटाईन डे आधीच प्रेमाच्या उत्साहाचा आनंद लुटला. यानिमित्त आलेल्या सर्व तरुण तरुणींनी राईट टू लव्ह च्या कामाबद्दल जाणून घेतेले.
या कार्यक्रमासाठी आकाश धनविज, दीप्ती नितनवरे ( अनहद सोशल फाऊंडेशन ) स्वप्नील जाधव ( मानस संस्था ), गणेश चप्पलवार ( परभन्ना फाऊंडेशन ), सागर काकडे ( मुक्ताई प्रतिष्ठान), आकाश शिंदे, ज्योतिबा आणि तृप्ती कांबळे, अमरजा शिंदे, गौरव नितनवरे, सुचिता सावंत, अजिंक्य शिंदे आदींनी मोलाचे सहकार्य केले.