शारीरिक हिंसेपेक्षा वैचारिक हिंसा अधिक धोकादायक – तुषार गांधी
सोलापूर : सध्या समाजात शारिरिक हिंसे सोबत वैचारिक हिंसा वाढत चालली आहे. शारीरिक हिंसेपेक्षा वैचारिक हिंसा अधिक धोकादायक आहे असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले. ते प्राणीमित्र शिवलाल शहा आणि स्नेहालय यांच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त काल सोलापूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सांगली येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांना डॉ .नरेंद्र दाभोलकर स्मृती प्रेरणा पुरस्कार तुषार गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जेष्ठ प्राणी मित्र विलास भाई शहा, चंदूकाका सराफ अँड ज्वेलर्सचे चेअरमन किशोरभाई शहा, सौ. स्वरूपा राजेंद्र यड्रावकर, रावसाहेब पाटील उपस्थित होते.
तूषार गांधी पुढे म्हणाले की, सध्या जाती, धर्म व समुदायात वाढत चाललेली द्वेषभावना एका अर्थाने वैचारिक हिंसाच आहे. आपण भेदभावामुळे परस्परांतील स्नेह व प्रेमाला विसरत चाललो आहोत. इंग्रजांनी हा भेद ओळखून आपल्यावर राज्य केले. बापूजींनी हा भेद संपवल्याने स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी झाले. आज पुन्हा एकदा जात, धर्म व समुदायावरून द्वेष निर्माण केला जात आहे. कोणतीही अमानवीय घटना घडली की त्याचा आपल्याशी संबंध नाही असे समजून सामाजिक जबाबदारी टाळणे हे संवेदनशीलतेचे लक्षण नाही. राजकारण हा एक समाजाचा अविभाज्य भाग असल्याने आपल्याला दुर्लक्ष केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका पोचेल.
पुरस्काराला उत्तर देताना अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, ‘मरा हुआ गांधी जिंदा गांधी से अधिक खतरनाक है’. जिवंत गांधी पेक्षा मारलेले महात्मा गांधी प्रतिगाम्यांना सध्या अधिक धोकादायक वाटत आहेत. कारण महात्मा गांधींच्या खुनानंतर नंतर त्यांचे विचार जगभरातील लोकांनी स्वीकारून त्यांना मृत्यूनंतर ही जिवंत ठेवले आहे. नेमके असेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाबतीत घडले आहे. जिवंत दाभोलकरांच्या पेक्षा शहीद दाभोलकर आज अधिक प्रमाणात लोकांना प्रेरित करीत आहेत. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांच्या विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. महात्मा गांधींची निर्भयता डॉ. दाभोलकरांच्या मध्ये होती. त्याचा उपयोग ते अंनिसची चळवळ चालवताना नेहमी करत. आजचा हा पुरस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत आम्ही केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचा गौरव आहे.
या कार्यक्रमास सांगली अंनिसचे कार्यकर्ते डॉ.संजय निटवे, फारुख गवंडी, जगदीश काबरे, धनंजय आरवाडे, आशा धनाले, त्रिशला शहा, उषा शहा, मधुरा सलवारू, अंजली नानल, डॉ. अस्मिता बालगावकर, ब्रह्मानंद धडके, चंद्रकांत उळेकर, डॉ.अशोक कदम, प्रा. हेमंत शिंदे उपस्थित होते.