सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात २०१३ साली जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करणेबाबत पोलीस अधीक्षकांना नुकतेच परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
पोलीस महासंचालकांच्या या परिपपत्रकानुसार सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करावेत अशी मागणी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अरविंद बोडखे यांची भेट घेऊन केली. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, फारुख गवंडी, जगदीश काबरे, सुनील भिंगे, नानासो पिसे, आशा धनाले, त्रिशला शहा उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात अंनिसने म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासक पाऊल आहे. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. हे कक्ष आपल्या सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला स्थापन करावेत.
राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने असलेल्या आदेशात अन्वये, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, सदर अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये उद्धृत केलेली कर्तव्ये पार पाडण्याकरीता पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे), तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या तसेच,’महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.’
जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस स्टेशनला कक्ष स्थापन करणार अशी जाहिराती महाराष्ट्र शासनाने मागील आठवड्यात प्रसिद्ध केली आहे.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करणेबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गेल्या अनेक दिवसांपासूनची एक मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. या कायद्याचे प्रशिक्षण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मदत करेल.
पोलीस प्रशासनाने विनंती हे कक्ष सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला स्थापन करावेत तसेच त्यांची माहिती जनतेला जाहीर करावी, जेणेकरून पीडित लोक आपली तक्रार निर्भयपणे या कक्षाकडे घेऊन येतील.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिना (२० ऑगस्ट) पर्यंत ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन झाले तर डॉ. दाभोलकरांना हे एक कृतिशील अभिवादन ठरेल अशी अपेक्षाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केली आहे.