पुणे : आपल्या देशात शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. दर्जेदार शिक्षणाची सर्वांना संधी मिळणं हे महत्त्वाचे आहे. पण आज तथाकथित गुणवत्तेच्या नावाखाली गरीब, दलित, आदिवासी, मुस्लिम यांचा शिक्षणातील प्रवाह रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, गुणवत्ता ही दांभिक कल्पना आहे असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात (दिल्ली) यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या ‘गुणवत्ताशाहीचे अवडंबर’ या विशेषांकाच्या आँनलाईन प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. डॉ. थोरात यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन संपन्न झाले.
डॉ. सुखदेव थोरात म्हणाले की, गुणवत्ते (क्वालिटी) पेक्षा समानतेचा (इक्वालिटी) चा विचार महत्त्वाचा आहे. भारतात २००० वर्षे पासून जात आधारित शिक्षण व्यवस्था होती. त्यामुळे दलित, मागास जाती यांना शिक्षणाच्या संधी नाकारल्याने मागे राहिल्या त्यांच्या मध्ये गुणवत्ता नव्हती म्हणून त्या मागे राहिलेल्या नाहीत. ब्रिटिशांनी जेव्हा भारतीयांना गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षण देण्यास नकार दिला तेव्हा भारतातील तथाकथित उच्चवर्णीयांनी गुणवत्तेपेक्षा भारतीयांना शिक्षणांत समान संधी मिळावी अशी मागणी केली होती आणि आज देश स्वतंत्र झाल्यानंतर हेच तथाकथित उच्चवर्णीय गुणवत्तेच्या बाजूने आणि समान संधीच्या विरोधात बोलत आहेत.
डॉ. थोरात पुढे म्हणाले की, आज भारतातील ५४ टक्के शैक्षणिक क्षेत्र खाजगी संस्थांच्या ताब्यात आहे. त्यातच १०० परदेशी विद्यापीठे भारतात येणार आहेत. या सर्वांमुळे गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. सरकारने ‘आमच्या कडे शिक्षणासाठी पैसे नाहीत’ हा बहाणा करून शिक्षण क्षेत्र खाजगी, परदेशी संस्थांच्या ताब्यात देणे हे आपल्या देशासाठी, देशातील गरीब, दलित, आदिवासी यांच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
डॉ. सुखदेव थोरात आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले की, आजच्या शिक्षणपद्धती मधून डार्विनचा ‘उत्क्रांती सिध्दांत’ काढून तेथे ईश्वरचा ‘निर्मिती सिध्दांत’ आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे हे जग उत्क्रांत झाले नसून देवानेच निर्माण केले आहे, देवानेच जाती निर्माण केल्या असे चूकीचे धार्मिक संस्कार रुजविण्याचा डाव आहे.
या विशेषांकाचे संपादक आणि जेष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी म्हणाले की, समाजशास्त्रज्ञांच्या मते गुणवत्तेच्या कल्पना तसेच निकष हे त्या त्या समाजातील वर्चस्ववादी वर्गाच्या सोयीनुसार केलेले असतात. वर्चस्ववादी वर्गाने प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी वा ते टिकवण्यासाठी केलेल्या त्या क्लृप्त्या असतात. सध्याचे गुणवत्तेविषयीचे निकष हे त्या क्लृप्त्यांपैकीच आहेत.
नानावटी पुढे म्हणाले की, ‘आरक्षणामुळे गुणवत्तेचा ऱ्हास होतो’ या गृहीतकाच्या मुळाशी ‘गुणवत्ता’ या बाबींवर केवळ उच्चवर्णीय जातींचा मक्ता आहे, हे गृहीतक आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारप्राप्त अभिजित बॅनर्जी आरक्षणासंदर्भात म्हणतात की, “आरक्षणामुळे गुणवत्तेचा ऱ्हास होतो याचा अद्यापपर्यंत कोणताही पुरावा उपलब्ध नाही.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णा कडलास्कर यांनी चळवळीचे गाणं सादर केले. वक्त्यांची ओळख मुक्ता दाभोलकर यांनी करून दिली. सुत्रसंचलन राहुल थोरात, तर आभार राजीव देशपांडे यांनी मांडले.