आष्टा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने नंदीवाले समाज जात बांधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांची संवाद बैठक पार पडली.
सांगली ( आष्टा ) : या बैठकीत अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी महाराष्ट्र शासनाने केलेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची माहिती नंदीवाले समाजातील जात बांधवांना दिली. या कायद्यानुसार कोणत्याही कारणाने कोणत्याही व्यक्तीस, कुटुंबास वाळीत टाकता येणार नाही. जात पंचायत बसवता येणार नाही. दंड ठोठावता येणार नाही. आंतरजातीय विवाह केला म्हणून त्या जोडप्यांना समाजातून बहिष्कृत करता येणार नाही. या सर्व कायद्याच्या तरतुदीचे समाज बांधवांनी पालन करावे असे आवाहन थोरात यांनी केले.
राहुल थोरात पुढे म्हणाले की, समाजातील अनिष्ट अघोरी प्रथा परंपरा आता आपण सोडल्या पाहिजेत. जात पंचायतीच्या नावाने समाजात सुरू असलेली समांतर न्यायव्यवस्था बंद करून संविधानाच्या न्यायव्यवस्थेवर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी कायद्याच्या तरतुदी बाबत माहिती देऊन सर्वांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले.
अंनिसच्या कार्यकर्त्या सीमा पाटील म्हणाल्या की, समाजातील तरुण पिढीने जातपंचायत सारख्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, व्यसनाधीनता, महिलांचा सन्मान याबाबतीत आपल्या समाजाला जागृत केले पाहिजे.
अंनिसच्या आणि पोलिसांच्या आवाहनाला जात बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन, आमच्या नंदीवाले समाजामध्ये जात पंचायत भरणार नाही, कोणाला वाळीत टाकणार नाही, आमच्या समाजात ज्या मुला मुलींनी आंतरजातीय विवाह केले असतील त्यांना समाजात सामील करून घेऊ, असे तोंडी आश्वासन दिले. समाजातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करून याबाबत लवकरच एक लेखी निवेदन सर्वा समक्ष जाहीर करू, असे आश्वासन नंदीवाले समाजातील उपस्थित जात बांधवांनी दिले. साधारण सात दिवसात याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन अंनिस च्या वतीने जात बांधवांना करण्यात आले.
या बैठकीस आष्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग काळे, अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ .सविता अक्कोळे, सीमा पाटील, जगदीश काबरे, प्रा. खडसे आणि नंदीवाले समाजातील जातबांधव उपस्थित होते.