ठाणे : ‘जाणीव फाऊंडेशन, ठाणे’ तर्फे आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट रोजी शैक्षणिक व संगणक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गाव चटाळे, आगरवाडी, आणि माकुणसार येथील तीन शाळांतील एकूण १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत ‘जिल्हा परिषद शाळा, चटाळे’ येथे ३ संगणक संच, ‘जिल्हा परिषद शाळा, आगरवाडी’ येथे १ संगणक संच असे एकूण चार संगणक संच भेट देण्यात आले. या संगणक संचांचा फायदा जवळजवळ ४०० विद्यार्थ्यांना होणार आहे, याचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच मोठा फायदा होईल.
सदर कार्यक्रमात अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक व वस्तूरूपात केलेल्या मदतीबद्दल जाणीव फाऊंडेशनने आभार व्यक्त केले. विशेष आभार ‘प्रताप रासम सर’ यांचे मानले गेले, ज्यांनी जानेवारी महिन्यात संस्थेस १० संगणक संच देणगी स्वरूपात दिले होते. या संचांचा वापर जवळजवळ ६०० विद्यार्थ्यांना होणार आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाला योगेश सुर्यवंशी (संस्थापक व अध्यक्ष), राकेश ठाकुर (खजिनदार), अभिजित महाडिक (सचिव), लता काळे मॅडम, प्रतिमा तळेकर मॅडम, रश्मी पाठारे मॅडम, मंजुळा डाकी मॅडम, आणि इतर सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.