नांदेड येथे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.
नांदेड : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे क्रियाशील कार्यकर्ते आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर लिखित ‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नांदेड येथे अंनिस राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये काल संपन्न झाला.
या पुस्तकाचे प्रकाशन नांदेड येथील शुभारंभ मंगल कार्यालयात सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ .दि.भा. जोशी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामीण तंत्रनिकेतनचे प्राचार्य विजय पवार हे होते.
डॉ. दि. भा. जोशी म्हणाले की, ‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ हे राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केलेले डॉ. हमीद दाभोलकरांचे पुस्तक आपल्या आजीबाईंच्या बटव्यासारखे तो एक आधुनिक विज्ञाननिष्ठ बटवा म्हणून काम करेल. भावनिक प्रथमोउपचार ही एक मानसशास्त्रातील आधुनिक उपचार पद्धती आहे. त्यामध्ये व्यक्तीला उपदेश न करता समान पातळीवर येऊन समुपदेशन करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण इतर आजारांना प्रथमोपचार करतो, त्याचप्रमाणे मन आजारी पडल्यानंतर कशाप्रकारे घरच्या घरी प्रथमोपचार करावेत हे अतिशय सोप्या भाषेत सांगणारे हे पुस्तक आहे. आज-काल कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध त्याच्यामध्ये ओलावा कमी झाला आहे. मानवी संबंध कमी होऊन लोकांचे यांत्रिक संबंध वाढले आहेत. अपयश अपेक्षाभंग सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. अशावेळी हे पुस्तक नक्की मार्गदर्शकाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन डॉ. दि.भा. जोशी यांनी केले. डॉ. जोशी पुढे म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे ज्ञानापासून कृतीपर्यंतचा प्रवास आहे. मानवी नातेसंबंध सुदृढ होण्यासाठी विज्ञानासोबत विवेकवाद रुजवणे अत्यंत गरजेचे आहे.
पुस्तकाचे लेखक डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, मानसिक त्रास चालू झाल्यापासून ते मानसोपचार तज्ञाकडे जाण्यापर्यंत मधल्या काळात आपण आपल्या स्वतःच्या पातळीवर ज्या छोट्या मोठ्या गोष्टी करू शकतो त्याला भावनिक प्रथमोपचार म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने ही संकल्पना मांडली आहे. जसे आपले शरीर आजारी पडते तसेच आपले मन देखील आजारी पडते. शरीराच्या आजारात काही सौम्य आजार हे घरच्याघरी उपचार करून बरे होतात. तीव्र त्रास असेल तर तसे ओळखून वेळीच तज्ञाची मदत घ्यावी लागते. मानसिक आजाराच्या बाबतीत देखील हेच नियम लागू पडतात.
डॉ .हमीद दाभोलकर पुढे म्हणाले की,राग चिंता संशय निराशा अपराधगंड आणि लैंगिकता अशा भावना कशा हाताळाव्यात तसेच त्याचे रूपांतर मानसिक आजारात झालेले कसे ओळखावे याविषयी सांगोपांग चर्चा या पुस्तकात केली आहे. मानसिक आरोग्याबद्दल आजही लोकांच्या मनामध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत. मानसिक आजार झाला की लोक अजूनही अघोरी उपचाराला बळी पडतात. मानसिक आरोग्याची सर्वसामान्य जनतेला सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती व्हावी, आपल्या घरातील, आपल्या नात्यातील मन आजारी पडलेला व्यक्ती ओळखून त्याच्यावर भावनिक प्रथमोपचार करता यावेत यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजय पवार म्हणाले की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्यास आमच्या संस्थेचा नेहमी पाठिंबा असेल. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रस्तावनेत अंनिस राज्य कार्यकारी सदस्य फारूक गवंडी म्हणाले की, अंनिस ही मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारी संघटना असून, डॉ हमीद दाभोलकर यांच्या नवीन पुस्तकामुळे पुढील टप्यातील उपचार पद्धतीचा कार्यकर्त्यांना उपयोग होणार आहे.
पाहुण्यांचा परिचय डॉ. सारिका शिंदे आणि भगवान चंद्रे यांनी करून दिला. तर आभार मुंजाजी कांबळे यांनी मांडले. यावेळी नांदेड अंनिसचे कार्यकर्ते सम्राट हटकर, डॉ. शाम महाजन, डॉ. श्यामकांत जाधव, मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, साहित्यिक प्रकाश मोगले उपस्थित होते.