कॅण्डलमार्च काढून २६ गावातील महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना दिली शपथ.
भंडारा : नोबल शांतता पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी “बालविवाह मुक्त भारत”अभियानाची सुरुवात १६ ऑक्टोबर ला संपूर्ण देशात केली. लोकांना बालविवाह बद्दल जागरूक करणे, त्यांची विचारसरणी आणि वर्तन बदलणे, मुला मुलींची सुरक्षा सुनिश्चित करणे असे या अभियानाचे उद्देश आहे.
१६ ऑक्टोंबर ला सुरू झालेल्या या राष्ट्रीय अभियानात हितेंजु संस्थेच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी या तालुक्यातील २६ गावांमध्ये आणि शाळेमध्ये कॅन्डल मार्च काढून “बाल विवाह मुक्त भारत” ठेवण्याची शपथ घेऊन जनजागृती करण्यात आली.
संपूर्ण गावामध्ये कॅन्डल मार्च रॅली काढून ‘बेटी बचाव बेटी पढाव!!, कच्ची उमर मे ना करो विवाह दोनो का जीवन होगा तबह!, हर घर मे आवाज हो बालविवाह बंद हो! अशा उद्घोषणा देत संपूर्ण गावामध्ये आणि शाळेमध्ये बालविवाह मुक्तची शपथ देण्यात आली . संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामूहिक “बालविवाह मुक्त भारत” करिता शपथ घेतली.
बालविवाह मुक्त भारत अभियानाला यशस्वी करण्याकरिता राष्ट्रपाल उके, हितेंजु संस्थेचे समन्वयक शाम भालेराव, नीतू साखरे, प्रतिज्ञा उके , मीनाक्षी हट्टेवार, वृंदा शिरसाम, गोपिकाजी सोनवणे, प्रतिज्ञा उके, उपसरपंच रोशन सातवान, विवेक यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन हितेंजु संस्थेचे संस्थापक सचिव – धमलेश सांगोडे यांनी केले. कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, शिक्षक वर्ग, युवक, बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.