सोलापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारणी बैठक सोलापूर येथे उद्या शनिवार दि. ८ आणि रविवार दि. ९ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक हिराचंद नेमचंद कार्यालय, श्राविकाश्रम शाळेसमोर, सम्राट चौक. सोलापूर येथे दोन दिवस संपन्न होईल अशी माहिती राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, प्रा. अशोक कदम, अण्णा कडलास्कर, उषा शहा यांनी दिली.
या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विभागवार कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन केले जाणार आहे.
या बैठकीसाठी राज्यभरातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि शाखा पदाधिकारी तसेच क्रियाशील कार्यकर्ते असे मिळून २५० लोक उपस्थित राहणार आहेत.
बैठकीचे उद्घाटन शनिवार दि. 8 जून रोजी सकाळी १० वा. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते आणि डॉ. उमा प्रधान (प्रसिद्ध नेत्र तज्ज्ञ) यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. त्यानंतर दुपारी १२ वा. अंनिसने मागील सहा महिन्यात केलेल्या कामाचे राज्य आणि जिल्हा अहवाल सादरीकरण करण्यात येईल.
सायं.5 वा. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या निकालाचा अन्वयार्थ’ यावर मुक्ता आणि हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, फारुख गवंडी विचार व्यक्त करणार आहेत.तर सायं. 6 वा. सोलापूर येथील अंनिसचे देणगीदार व जाहिरातदार यांचा सत्कार राजेंद्रभाऊ गिरमे (चेअरमन, सासवड माळी शुगर्स फॅक्टरी, माळीनगर) यांच्या हस्ते ठेवला आहे.
सायं. ७ वा. ‘भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर सरफराज अहमद, (इतिहास अभ्यासक, सोलापूर) यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलाताई दाभोलकर या असणार आहेत.
दुसऱ्या दिवशी रविवार 9 जून रोजी सकाळी ६.३० वा. सोलापूर शहरातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढला जाणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विभागवार कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन केले जाणार आहे. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र , अंनिस प्रकाशन विभाग, प्रशिक्षण विभाग, सोशल मीडिया विभाग, आंतरजातीय सहाय्य विभाग आणि मानसिक आरोग्य विभाग या विभागाच्या कामकाजावर चर्चा होणार आहे.
या बैठकीचा समारोप दुपारी २ वा. डॉ. बी.वाय. यादव (प्रसिद्ध सर्जन व अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी) यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा.डॉ.अर्जुन व्हटकर (लेखक, ग्रामीण कथाकार), डॉ. कृष्णा मस्तूद, (प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, बार्शी) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारोपप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पाच महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केले जाणार आहे.
या कार्यक्रमास अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अंनिसने केले आहे.