पुणे : वॉवेल्स द पीपल असोसिएशन (VOPA) आणि बजाज फिनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रकल्पातील उल्लेखनीय कामगिरीसाठी VOPA संस्थेचे शिक्षक श्री. राजेंद्र पोकळे यांना प्रतिष्ठित “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या (दांडेकर पूल) वतीने प्रदान करण्यात आला.
मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी निळू फुले सभागृह (कलामंच), दांडेकर पूल येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव मा. शिवाजी खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. मीना काटे, VOPA संस्थेच्या संचालिका मा. ऋतुजा जेवे, “आप्पी आमची कलेक्टर” फेम अभिनेत्री मा. पुष्पा चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. राजेंद्र पोकळे यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारांमुळे, तसेच VSchool – डिजिटल शिक्षण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार स्वीकारताना श्री. पोकळे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, वोपा मधील माझ्या सहकाऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि संस्थेचे संचालक मा. प्रफुल्ल शशिकांत यांच्या सहकार्याचा आहे. हा सन्मान मला भविष्यात आणखी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करेल.”
साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. मीना काटे यांनी सांगितले की, “राजेंद्र पोकळे सर व्ही-स्कूल डिजिटल शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा सन्मान इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
VOPA संस्थेने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले व्ही-स्कूल हे मोफत मराठी डिजिटल शिक्षण अॅप्लिकेशन गेल्या तीन वर्षांत 30 लाख लोकांनी वापरले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







