पुणे : शहीद कॉम्रेड भगतसिंग जयंतीनिमित्त आज ‘नव समाजवादी पर्याय’ व ‘श्रमिक हक्क आंदोलन’ तर्फे बालगंधर्व ते गुडलक चौक अशी रॅली काढण्यात आली. यात पुणे शहरातील शंभराहूनही अधिक तरुण व कामगार सहभागी झाले होते.
यावेळेस बोलताना ‘श्रमिक हक्क आंदोलन’चे जनरल सेक्रेटरी सागर सविता धनराज यांनी “भगतसिंग व त्याचे साथीदार यांचे ध्येय केवळ ब्रिटिशांपासून देश स्वतंत्र करणे इतके नव्हते. त्यांच्यासाठी हा केवळ एक टप्पा होता. त्यांचे खरे ध्येय एक नव्या प्रकारचा देश घडविणे, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकणारा समाज घडवणे हे होते.”
यानंतर ‘नव समाजवादी पर्याय’च्या श्रावणी बुवा यांनी बोलले की ‘भगतसिंग हे केवळ भावनिक रित्या लढणारे तरुण नव्हते. त्यांनी देशाचा, समाजाचा विविध विचारसरणीचा अभ्यास करून त्यानंतर मार्क्सवादी विचारसरणीचा स्वीकार केला. त्यानुसार त्यांनी एक समाजवादी राष्ट्र उभारण्याचा निर्धार केला.”
निहारिका भोसले यांनी “भारतातील विविधता लक्षात घेता जर धार्मिक, सांप्रदायिक शक्तींना रोखले नाही तर भारत एक भ्रष्ट व जमातवादाने ग्रस्त देश बनेल ही भगतसिंग ची चेतावणी आज खरी ठरत आहे. त्यामुळे आज एक शोषणमुक्त व समतापूर्ण राष्ट्र घडविण्याचे त्याचे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत.” असे विचार मांडले.
यावेळेस श्रमिक हक्क आंदोलनाचे जगदीश राठोड, अशोक राठोड, हरिश्चंद्र राठोड, यलम्मा गुल्लाशेठ, मलम्मा कांबळे, रवी राठोड, ताऱ्या राठोड, बालाजी झुकझुके, देविदास पवार, अंगुर खत्रावत तसेच नव समाजवादी पर्यायचे मनोज वाघमारे, आदित्य दोड, आदित्य कांबळे, आकाश नवले, शुभी हे उपस्थित होते. तसेच विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समिती तफे राहुल ससाणे हे उपस्थित होते.