पुणे : काल पुणे येथे “सत्यशोधक युवा परिषद” अत्यंत उत्साहात पार पडली. पुण्यातील समविचारी संघटनांनी एकत्र येऊन सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित केला. या परिषदेत महात्मा जोतिराव फुल्यांच्या सत्यशोधक विचारांचा जागर घालण्यात आला. अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमधून या विचारांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले गेले.
या परिषदेतील एक प्रमुख आकर्षण म्हणजे “Think tank शोध सत्य धर्माचा” या नाटिकेचे सादरीकरण. ही नाटिका ‘संविधान संवाद समिती’ तर्फे सादर करण्यात आली. नाटिकेच्या माध्यमातून ‘धर्म’ या संकल्पनेवर मोलाचे भाष्य करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, जगद्गुरू तुकाराम महाराज, महात्मा फुले आणि संविधान यांची मांडणी करून नाटिकेने प्रेक्षकांना एक विचारप्रवर्तक प्रवास घडवला.
धम्मपद, दोहे, अभंग आणि संविधानातील मूल्य प्रणाली यांच्या माध्यमातून ‘धर्म’ ही संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नाटिकेचे सादरीकरण अतिशय संवेदनशील होते, ज्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत याची विशेष काळजी घेतली होती.
कार्यक्रमानंतर प्रेक्षकांकडून आलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे नाटिकेच्या टीमला प्रचंड समाधान मिळाले. या नाटिकेच्या यशाचे श्रेय हृदयमानव अशोक यांच्या उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शनाला जाते. संगीतकार आणि गायक मिलिंद सावळे यांच्या दमदार संगीतामुळे नाटिकेची उंची आणखी वाढली.
नाटिकेच्या यशस्वी सादरीकरणासाठी रेंदाळकर सर, स्वामी सर आणि ‘संविधान संवाद समिती’चे राज्यसचिव राजवैभव यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. सरावासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे आभार मानले गेले.
ह्या नाटिकेसाठी शितल यशोधरा, पुष्पा क्षीरसागर, बाळासाहेब कदम, आणि शर्मिला जोशी यांनी माहिती आणि संकलनाचे काम केले. हृदयमानव अशोक यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली, तर मिलिंद सावळे यांनी संगीत आणि गायनाचे काम उत्तम प्रकारे पार पाडले.
संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली, आणि आदरणीय सुभाष वारे सरांनी कौतुकाची थाप देऊन कार्याची दखल घेतली.