इंदूर : देशातील ट्रक चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्माईल फाउंडेशन आणि ब्रिजस्टोन इंडिया यांनी संयुक्तपणे इंदूर येथे चौथे ब्रिजस्टोन सारथी सपोर्ट सेंटर (BSSC) सुरू केले आहे. ट्रक चालकांना आवश्यक आरोग्य आणि सहाय्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा आतापर्यंत 72,500 हून अधिक लाभार्थ्यांना फायदा झाला असून, त्यापैकी सुमारे 95 टक्के लाभार्थी ट्रकिंग समुदायातील आहेत. देशभरातील ट्रक चालकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी आणि त्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ट्रक चालकांना अनेकदा सलग तासन्तास वाहन चालवावे लागते. अनियमित कामाचे तास, सततचा प्रवास आणि शारीरिक ताण यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन ब्रिजस्टोन सारथी सपोर्ट सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.
या केंद्रात ओपीडी सेवा, फिजिओथेरपी, वेदना निवारण उपचार, नेत्र तपासणी, आरोग्य जनजागृती, मानसिक आरोग्य सहाय्य, समुपदेशन, क्रीडा उपक्रम, रस्ता सुरक्षा व प्रथमोपचार जनजागृती तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय, चालकांना वेळेवर उपचार मिळावेत, आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या व्यवसायातील आव्हानांना अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे, यासाठीही या केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ट्रकिंग समुदायाचे सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासोबतच रस्ते अधिक सुरक्षित आणि वाहतूक व्यवस्था अधिक शाश्वत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्माईल फाउंडेशनने म्हटले आहे.
