पुणे : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दालन तयार करण्यात आले. असे संविधान दालन तयार करणारी सुकलवाडी ही पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने गावातील विविध समाजघटकातील (विशेषतः वंचित, अल्पसंख्याक) महिलांच्या हस्ते या संविधान दालनाचे उद्घाटन करण्यात आले. मुक्ताबाई देवकुळे, रेश्मा शेख, पवित्रा भोसले, विमल पवार, यांच्यासह उर्मिला पवार, हर्षदा पवार, अश्विनी चव्हाण, वैजयंता दाते या महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते या संविधान दालनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच संदेश पवार, उपसरपंच दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत सदस्य योगेश पवार, नितिन गावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
या संविधान दालनात संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व, संविधानिक मुल्ये, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांच्याविषयी सविस्तर माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले आहे. याशिवाय संविधाननिर्मितीत सहभाग घेणाऱ्या 15 महिलांची माहिती देणारी दिनदर्शिका, संविधानाबद्दल सविस्तर माहिती देणारी पुस्तके, गुजरातमधून मागविण्यात आलेले संविधानघर, तसेच अशोकस्तंभ, इ. गोष्टींचे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे.
येत्या काळात संविधान दालनात संगणक उपलब्ध करून त्याद्वारे संविधानाशी संबंधित विविध शॉर्ट फिल्म, मालिका, व्हिडीओ, ईबुक संकलित करुन लोकांपर्यंत पोहोचवले जातील.’, अशी माहिती सरपंच संदेश पवार यांनी दिली. तसेच ‘हा केवळ एक टप्पा आहे, याचबरोबर शालेय मुले, युवा, महिला या सर्वांसोबत संविधान संवाद सुरू आहे. त्याद्वारे ग्रामपंचायत कार्यकारिणी तसेच सर्व लोकांच्या सामुहिक प्रयत्नाने आणि सहकार्याने खऱ्या अर्थाने ‘हर घर संविधान’ हे अभियान राबवून प्रत्येकाच्या मनात संविधानिक मुल्ये रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे’ ही संविधान दालनाची संकल्पना मांडणारे संविधान अभ्यासक श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी स्पष्ट केले.
हे संविधान दालन तयार करण्यासाठी सुकलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत माजी सरपंच दत्ताअण्णा पवार, माजी उपसरपंच संतोष पवार, धनंजय परशुराम पवार, संजय चव्हाण, युवा नेते राहुल यादव, नितिन पवार, संतोष भोसले, दिगंबर पवार यांनी विशेष मेहनत घेतली.