पुणे : ‘आवाज दो – हम एक है, लढेंगे जितेंगे’, ‘दहा वर्षे खुनाची -कार्यरत विवेकी असंतोषाची’, ‘फुले शाहू आंबेडकर – आम्ही सारे दाभोलकर’, ‘हिंसा के खिलाफ – मानवता की और’ या घोषणा देत आणि मशाल प्रज्वलित करून कार्यकर्त्यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर यांना 10 व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अभिवादन केले.
दाभोलकर यांचा खून करण्यात आलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मृतिजागर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पावसात उभे राहून कार्यकर्त्यानी गाणी, घोषणा आणि मनोगताद्वारे अभिवादन केले. महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, पुणे जिल्हा अध्यक्ष मानव कांबळे, विचारवंत आनंद करंदीकर, प्रधानसचिव संजय बनसोडे यांनी अभिवादन मनोगत व्यक्त केले. डॉ ठकसेन गोराणे यांनी प्रास्ताविक तर विशाल विमल यांनी सूत्रसंचलन समारोप केला.
दाभोलकरांचा खून होऊन साडेतीन हजार दिवस झाले. आमचा माणुस तर गेलाच, पण त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करून समाजात कायदा सुव्यवस्था नांदते हे सांगण्यात केंद्र – राज्य सरकार आणि तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. कारवाईच्या मागणीसाठी दाभोलकरांच्या वैचारिक वारसदारांनी मोठा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सरकारने कार्यकर्त्यांचा अंत पाहू नये, असा इशारा मानव कांबळे यांनी दिला.
राज्य – केंद्र सरकारला दाभोलकरांच्या खुनाचा आणि तपास, कारवाईचे गांभीर्यच नाही. खुनाचे सूत्रधार माहीत असूनही कारवाई होत नाही. त्यांचा शोध घेवून त्यांना तत्काळ अटक करून त्यांचेवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी. या अक्षम्य विलंबाबाबत राज्य व केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी माधव बावगे यांनी केली आहे.
अनिल करवीर, परिक्रमा खोत, माधुरी गायकवाड, राहुल उजागरे, अनिल दरेकर, स्वप्नील मानव यांनी गाणी सादर केली. मेणबत्या आणि मशाल पेटवून कार्यकर्त्यानी दाभोलकरांना अभिवाद केले. महा.अंनिससह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.