पुणे : “जात हीच एक अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा ही जातिव्यवस्थेच्या विषम चौकटीत आणखी शोषक बनत जाते.h त्यामुळे जात आणि अंधश्रद्धा या दोन्ही जेव्हा सामाजिक पातळीवर संस्थात्मक स्वरूप घेऊन अधिकाधिक लोकांचे जगण्याचे स्वातंत्र्य हिरावून प्रगतीचे रस्ते बंद करते तेव्हा अंधश्रध्दा निर्मूलन आणि जाती अंताचे लढे हे एकमेकांना पूरक बनतात,” अशी मांडणी हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड येथील अभ्यासक डॉ. सूरज येंगडे यांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशन सोहळा पुण्यातील साधना प्रकाशनच्या आवारात त्यांनी केले. त्यावेळी जात आणि अंधश्रद्धा या विषयावर त्यांनी भाषण केले.
याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे, व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात, राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले फारुक गवंडी, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
“तमिळनाडूमध्ये पेरियार यांनी विवेकवादी आणि पुरोगामी चळवळ रुजवली. या चळवळीचा परिणाम म्हणून तिथे आज विवेकवादी आणि पुरोगामी पक्ष सत्तेवर आहे. महाराष्ट्राला आपण पुरोगामी राज्य म्हणतो. पण ते कोठेच दिसत नाही. गोपाळ गणेश आगरकर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतो. मग महाराष्ट्रात पुरोगामी सत्तेवर का येत नाहीत,” असा सवाल सुद्धा डॉ. सूरज यांनी शुक्रवारी उपस्थित केला.
डॉ. एंगडे म्हणाले, “प्रस्थापित असलेली समाज व्यवस्था जो टिकवतो, त्या वर्गाला अंधश्रद्धेचा फायदा होतो. त्यामुळे आपला वैचारिक हल्ला या वर्गाविरोधात व्हायला हवा. अंधश्रद्धा निर्मूलनासमोर जात ही सगळ्यात मोठी भिंत आहे. जात न संपवता अंधश्रद्धा निर्मूलन करायला गेले, तर ते काम अर्धवट राहील. अंधश्रद्धा हे जातीविरोधात लढण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ देखील आहे. कारण सर्व प्रकारच्या विचारसरणीचे लोक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एकत्र येऊ शकतात.
माजी न्यायमूर्ती गोखले म्हणाले, “आज मोठ्या संख्येने मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात येत आहे, ही आश्वासक गोष्ट आहे. पण, जातीअंतासाठी असा मोठ्या प्रमाणावर काम करणारा आणि पक्षविरहित गट निर्माण होणे महत्त्वाचे आहे.” राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले. श्रीपाल ललवाणी यांनी आभार मानले. डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ” डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुरू करण्याच्या दहा वर्षे आधी दलित समाजाच्या समस्यांवर काम करण्यासाठी एका संस्थेची स्थापना साताऱ्यात १९७५ च्या आसपास केली होती. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्त्वाखाली त्रिपुटी या गावात सत्याग्रह सुद्धा त्यांनी केला होता. रोहित वेमुला सारख्या युवकाला स्वतःला सिद्ध करण्याची उर्मी गमवावी लागणं आणि त्यामुळे त्याचा जीव जाणं हे आपल्या जातीयवादी व्यवस्थेचं भयाण वास्तव आहे. आपल्याला युवकांची ती उर्मी नष्ट होऊ द्यायची नाही, त्या दृष्टीने सूरज येंगडे किंवा नागराज मंजुळे यांचं काम मला महत्त्वाचं वाटतं. विवेकाच्या चळवळीतील विचारधारा असं सांगते की बाहेरचं वास्तव कितीही भयाण असलं तरी आपण कसं वागायचं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे सूरज तरुणांशी जो संवाद साधत आहे त्याकडे मी आशेने पाहतो.”
डॉ.सूरज येंगडे यांच्या भाषणातील इतर ठळक मुद्दे
■ येथील पिळवणूक करणाऱ्या व्यवस्थेने महापुरुष, संत यांना एका चौकटीत बांधले. त्यांची ओळख कायम अमुक एका देवाचे भक्त म्हणून बंदिस्त केली. त्यातून त्यांना मुक्त करण्याची गरज आहे.
■ धर्म आणि विज्ञान, यामध्ये धर्म शंभर टक्के खात्री देतो, तर विज्ञानात एक टक्का बदलाला वाव असतो. लोकांना तात्पुरता दिलासा हवा असल्याने ते धर्माची निवड करतात.
■ स्वतःला दोष देणे आणि आत्मविश्वास नसणे, यांमुळे अंधश्रद्धा वाढायला लागली. जातदेखील स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसण्यावर आधारित आहे.
■ आपल्यातील विवेक हरतो तेव्हा देवाचा जन्म होतो. देव आपल्यातील भीतीचा आधारस्तंभ आहे.
■ मिथके वाईट नसतात, पण मिथके संस्थानिक स्वरूपात समाजात कायमस्वरूपी ठाण मांडतात, तेव्हा ती घातक ठरतात.
■ अंधश्रद्धेच्या जगात देव आणि भक्त, यांच्यात मध्यस्थी करणाऱ्यांचाच बँक बॅलन्स वाढतो. लोकांचे पैसे लुबाडलेले, बलात्कारी, लैंगिक शोषण केलेले लोक आपल्याकडे ‘मध्यस्थ’ होतात.