सांगली : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती समाज सुधारकांचा कृतिशील व विवेकी वारसा पुढे नेणारी चळवळ आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेस संतविचार आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयी जनप्रबोधन व्हावे यासाठी, समितीच्या वतीने सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग, विविध उपक्रम विभाग व विवेक जागर संस्था आयोजित १४ ते २३ मे या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये वारसा संतांचा अंधश्रद्धा, निर्मूलनाचा या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर जनप्रबोधन यात्रा निघणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने थोर राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जन्मभूमी सेनगावपासून या प्रबोधन यात्रेची सुरुवात होणार असून शनिवार १४ मे रोजी सेनगाव, मोझरी, मुक्ताईनगर, निफाड, त्र्यंबकेश्वर, आळंदी, देहू, पिंपळनेर, सासवड, श्रीगोंदा, आपेगाव, पैठण, दौलताबाद, नरसी नामदेव, गंगाखेड, परळी, तेर, आरण, मंगळवेढा मार्गे जाऊन पंढरपूर येथे २३ मे रोजी समारोप होणार आहे. या संपूर्ण प्रबोधन यात्रेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर व संविधान प्रचारक सुभाष वारे हे आपल्या परंपरेतील समतावादी संतांचे कार्य, विचार व त्यांनी चालवलेली मानवतावादी चळवळ याविषयी प्रबोधन करणार आहेत. या प्रबोधन यात्रेचे अभियान प्रमुख म्हणून
हरिदास तम्मेवार, मनोहर जायभाये, हनुमंत मुंढे हे समन्वय करणार आहेत.
या यात्रेचे संयोजक म्हणून नितीन राऊत व अनिल शोभना वसंत हे करीत आहेत. तरी या प्रबोधन यात्रेत बहुसंख्येने सहभागी असे आवाहन राज्य कार्यकारी समिती महाअंनिस व विवेक जागर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
