भर रस्त्यात मध्यभागी झोपण्याची सवय या महिलेच्या पाय मोडण्याला जबाबदार होती. मनोयात्रींना उपाशी चालत राहिल्यामुळं प्रचंड थकवा आणि थकव्याने ग्लानी येते. डोक्यातल्या जखमा, त्यावर घोंगावणाऱ्या माश्या आणि पायाचं हाड मोडलेल्या अवस्थेत राहावं लागणाऱ्या मनोयात्री महिलेच्या वेदना शब्दांपलिकडच्या होत्या. पण अशा महिलेला खडतर सायास करून जेव्हा रुग्णालयात दाखल केलं जातं आणि दोन दिवसांनी चौकशी केल्यावर ती महिला वॉर्डातून ‘ गायब ‘ गेल्याचं सांगितलं जातं तेव्हा जे क्लेश झाले ते सांगण्यासारखे नाहीत !
विविध सामाजिक कामांत सर्जनशील वेळ आणि ऊर्जा देणारा मित्र अमोल देसाई याने एका जखमी महिलेचा व्हिडीओ मला पाठवून दिला होता. हा व्हिडीओ पाहिल्यावर मी तात्काळ त्याला फोन केला आणि महिला कुठं आहे हे विचारलं. त्यानं बेळगावजवळ असलेल्या निंगेनहट्टी गावाचं नाव सांगितलं. महापुराच्या काळात आठ दिवस वैद्यकीय आणि इतर मदत करत या रस्त्यांवरून आम्ही फिरलेलो होतो. खूप लांब आणि कच्च्या रस्त्यावरून प्रवास करून दोन अडीच तासांनी जेव्हा आम्ही त्या गावाच्या बाहेर भर रस्त्यात त्या महिलेला झोपलेलं बघितलं तेव्हा काळजाचा ठोका चुकला. कारण या रस्त्यावर वाळूची वाहतूक करणारे कित्येक ट्रक ये जा करत होते. अमोल आणि त्याच्या मित्रमंडळींना ही जर दिसली नसती तर कुठल्यातरी गाडीखाली चिरडून मेली असती.
मी आपल्या रुग्णवाहिकेतली कात्री काढली आणि हातमोजे घालून तिच्या दुर्गंधी सुटलेल्या केसांना हात लावला तशी वेदनेनं ती कन्हली. डोक्यात जखमा झाल्या असणार हे मी ओळखून होतोच. कित्येक वर्षांत आंघोळ नसल्यानं धूळघाणीनं चिकटलेले केस, त्या केसांत हजारोंच्या संख्येनं असणाऱ्या ऊवा, मास्क लावूनही मला एक उग्र वास मेंदूला झिणझिण्या आणत होता.
अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक संपूर्ण केस कापून घेतले. केस कापत असताना आजूबाजूने ये जा करणाऱ्या अनेक लोकांनी गाडी थांबवून नेमकं काय चाललंय, याबद्दलचं कुतूहल पोसलं ! काही लोकांनी या महिलेशी कन्नड भाषेत संवाद करत तिला शांत बसवलं. काही लोकांनी आसपासच्या गावांमध्ये फोन लावत तिच्या कुटुंबाची खबर मिळते का, हे पाहिलं. एवढ्या काळात तिला स्वच्छ करून आम्ही जखमांवर बँडेज बांधलं आणि तिला उबदार कपडे घातले. अमोलच्या मित्रमंडळींनी तब्बल ८ किमी दूर जाऊन तिच्यासाठी खायला आणि पायात चपला आणल्या. परंतु ही महिला आपलं गाव ‘ हट्टी ‘ शब्दासदृश सांगत असल्यामुळं आणखी काही चौकशी करण्याचा अमोल आणि त्याच्या मित्रमंडळींनी प्रयत्न केला. त्यात यश आलं नाही…
तिच्या पायाचं हाड घोट्याजवळ मोडलेलं होतं . पायावरून दुचाकी गेली असण्याची शक्यता होती. कारण ही महिला सरळ रस्त्यातच झोपत असायची.
आता या मोडलेल्या हाडावर उपचार होण्यासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा निर्णय घेऊन याकामी मा. जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेण्याचे ठरले. अमोलनं त्यांच्याशी संवाद करून १०८ रुग्णवाहिका बोलावली आणि त्यातून तिला CPR ( जिल्हा रुग्णालय ) मध्ये पाठवण्यात आलं. आता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फोन केले आहेत म्हटल्यावर या महिलेवर उपचार होऊन तिचं योग्य ठिकाणी पुनर्वसन होईल असं आम्हाला वाटलेलं होतं. परंतु , अमोलनं जेव्हा दोन दिवसांनी चौकशी केली तेव्हा ही महिला वार्डातुन पळून गेल्याचं सांगण्यात आलं.
CPR मध्ये आपण दाखल केलेले बेवारस रुग्ण एकतर पळून गेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाल्याचा निरोप, चौकशीअंती, मिळण्याचा आपला गेल्या १० वर्षांतला अनुभव आहे. आपल्या देशातल्या उदासीन आणि संवेदनाहीन आरोग्यव्यवस्थेचा चेहरा म्हणजे आपली सरकारी रुग्णालये आहेत. (अपवाद असतील ! ) या रुग्णालयांमध्ये नोकरी करणारे लोक तुम्हाला भेटतील; पण सेवा करणारे भेटणार नाहीत ( अपवाद आहेत ! ) ‘नोकऱ्या’ मिळवून स्वतःची आयुष्ये नीट करणाऱ्या लोकांना गरिबांच्या आयुष्याचं फार काही पडलेलं असत नाही, हेच चित्र बहुतेकदा बघायला मिळतं.
दाखल केलेल्या महिलेवर तात्काळ उपचार केले असते तर बिचारीला मोडका पाय घेऊन आजही रस्त्याच्या मध्यभागी झोपण्याची वेळ आली नसती. कोरोनामुळं खाजगी प्रकल्पांना मर्यादा असल्या तरी सरकारी मनोरुग्णालयात दाखल करता आलं असतं. पण या महिलेकडं ‘ लक्ष ‘ द्यायला वेळ कुणाकडेही नव्हता. सबंध जिल्हा रुग्णालय, सबंध समाजव्यवस्था इतकी व्यस्त होती की, एक वेदनेनं तडफडणारा जीव या लोकांकडून सांभाळता आला नाही.
इतके दिवस आरोग्य यंत्रणेवर लिहिताना वाटायचं की, कशाला आपण या जखमा उकरायच्या. जसं चाललंय तसं चालू द्यावं, काही लोकांना तरी सेवा मिळतच असते की, तीही आपल्यामुळं बंद व्हायला नको…! पण खरं सांगू का – आपल्या अशा विचार करण्यामुळं आरोग्य यंत्रणा अजगर झाली आहे. आता या सरकारी रुग्णालयांचं हे ‘असं’ असणं लोकांनी स्वीकारलेलं आहे. पत्रकारांना काहीही पडलेलं नाही, नेते मंडळींनी पाठवलेल्या लोकांची सोय फोन केल्यावर होते त्यामुळं तेही यात सुधारणा घडवून आणण्यासाठी काहीही करत नाहीत. एकूण काय आहे तर, पैसे असतील तर जीव वाचवण्यासाठी लढाई लढता येईल अन्यथा उपचार, अन्न, पाणी यांच्या अभावात जीव सोडावा लागेल, हे महासत्ता ( सरकारी बातमीदार यंत्रणांनी उभी केलेली प्रतिमा ! ) होऊ घातलेल्या भारतातलं भयानक वास्तव आहे.
महिला वार्डातून गायब झालेल्या या महिला मनोयात्रीविषयी जिल्हा रुग्णालयाला विचारणारं कुणीही नाही. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून दाखल केलेल्या रुग्णाची अशी हेळसांड होत असेल तर सामान्यांना उपचार मिळवण्यासाठी काय दिव्य करावी लागत असतील याचा विचार करा.
‘काहीच नसण्यापेक्षा काहीतरी सुरू आहे ना’ – या मानसिकतेवर समाधानी राहणारे लोक व्यवस्था नादुरुस्त, रोगट करतात.
मोडलेला पाय घेऊन कुठल्याशा अनोळखी रस्त्यावर उपाशी तापाशी ही महिला फिरत असेल कुणास ठाऊक. ती आता मेली तरी कुणालाही फरक पडणार नाही.
– अमित प्रभा वसंत | माणुसकी फाउंडेशन, आजरा, कोल्हापूर