बाबू हरदास यांचा जन्म ६ जानेवारी १९०४ रोजी कामठी, नागपूर येथे झाला. पटवर्धन हायस्कूल मध्ये १० वी पर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह साहूबाई यांच्यासोबत झाला. पुढे सामाजिक चळवळीत ते सक्रिय झाले. बाबासाहेबांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता, लांबून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केले, तर मजुरांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून रात्र शाळा चालू केल्या.
विदर्भातील दलित आणि आदिवासी समाजातील लोक तेंदू पत्ते गोळा करत, बिडी कारखान्यांमध्ये काम करत तसेच घरोघरी बिडी वळण्याचे काम देखील चालत असे. बिडी कारखानदार आणि कंत्राटदार अशा लोकांची पिळवणूक करत असत. १९२५ साली बाबू हरदास यांनी ते लक्षात घेऊन त्यांच्या न्याय व हक्कासाठी बिडी कामगार संघटना उभी करून त्यांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून दिले. बिडी मजुरांच्या संघटनेचे काम केवळ विदर्भापुरतेच मर्यादित राहिले नाही. १९३० साली त्यांनी मध्यप्रदेश बिडी मजूर संघाची स्थापना केली.
बाबू हरदास हे एक उत्तम कवी व लेखक होते, १९३२ साली त्यांनी ‘महारठ्ठा’ नावाचे पत्रक काढले. त्याच साली झालेल्या ‘डिप्रेस्ड क्लास मिशनचं दुसरं अधिवेशन कामठी येथे झाले त्यात बाबू हरदास यांनी या अधिवेशनाचे स्वागत समितीचे अध्यक्षपद भूषविले, या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांनी अतिशय भव्य स्वागत केले. बाबासाहेबांच्या या भेटीनंतर त्यांच्यावर त्यांचा आणखीन प्रभाव झाला व चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी त्यांचा उत्साह अधिक कैक पटीने वाढला.
१९३७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ‘ स्वतंत्र मजूर पक्ष ‘ पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली, समोर धनाढ्य व्यक्ती, पाहिजे तितक्या पैशांचे आमिष, जिवे मारण्याची धमकी मिळून देखील त्यांनी उमेदवारी मागे नाही घेतली व ते म्हणाले “मी आंबेडकरांच्या पक्षातर्फे उभा आहे, आम्ही भीक मागणे केव्हाच सोडून दिले आहे. आता आमच्या हक्काचं आम्ही मिळवून राहू. व पुढे काय होईल ते पुढचे पुढे बघू.” विरोधकाकडे पैसा आणि ताकद असून देखील बाबू हरदास ही निवडणूक जिंकले आणि सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलवर गेले.
अतिशय कमी वेळात चळवळीसाठी प्रचंड मोठे कार्य करणाऱ्या जय भीम प्रवर्तक बाबू हरदास यांना जयंती दिनी त्रिवार अभिवादन !
दस्तुरखुद्द ! संतोष आंभोरे