अमित प्रभा वसंत | माणुसकी फाऊंडेशन आजरा, कोल्हापूर
गारठलेला पाऊस भुरभुरत धनगरवाड्यावरच्या घरातल्या प्रत्येक चुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता…जनावरांना वाघटाच्या भीतीनं अंधार पडण्यापूर्वी गोठ्यात डांबलं होतं. आमची, ‘माणुसकी’ ची गाडी वाड्यावर सायंकाळी पोहोचली होती. संध्याकाळ आणि रात्रीच्या संगमावर शेतात काम करताना, जनावरांमागे डोंगरात फिरताना भिजून चिंब झालेल्या आणि गारठलेल्या प्रत्येकाला गरम पाण्याची आंघोळ आणि चुलीची ऊब निकडीची होती.
अंधार आणि भुरभुरता पाऊस दोघांनी मिळून वाडा आपल्या मुठीत घेतला होता …!
यावेळी डॉ. रवी यांनी मुबलक वेळ दिल्यामुळं वाड्यावरच्या बहुतेक लोकांना तपासून गोळ्या औषधे देता आली. बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळं रुसवट प्रश्नांचा माझ्यावर भडिमार झाला; पण तो तात्पुरता होता ! यानंतर चहा पिण्याचा आग्रह करत प्रत्येकजण आपापल्या अडचणी आणि सुख दुःख आमच्यासोबत वाटत होता. राशन दुकानाच्या बदललेल्या जागेसंदर्भात संवाद झाला.
मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सकाळपासून रात्रीपर्यंत राबणाऱ्या लोकांना अंथरुण अमृतासमानच ! या थंडगार पावसामुळं सर्दी, ताप, अंगदुखी आणि खोकल्यानं हैराण झालेल्या लोकांना ‘माणुसकी’ च्या रुग्णवाहिकेचा जुजबी का होईना पण दिलासा आहे, याची जाणीव माझ्या अंगावर शहारा आणत होती …!
यावर्षी अपुऱ्या निधीमुळं आपल्याला शैक्षणिक साहित्य सगळ्यांना पुरेल एवढं देता आलं नाही. तरीही मुलांच्या शिकण्याच्या उर्मीला ब्रेक लागला नाही. कोरोनाच्या साथीच्या काळात शाळाबाह्य झालेल्या मुलांना शहरात कामावर पाठवल्यामुळं घरात असणाऱ्या मोजक्या लोकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत होता. राशनच्या अन्नात कसला कस असणार; पण नाईलाजानं भुकेला पराभूत करण्याची पराकाष्ठा देशातल्या कित्येक लोकांना करावी लागत आहे.
महागाईच्या खड्ड्यात पडलेल्या या वाड्यावरच्या किंवा इतर लोकांना औषधे किंवा योग्य दवाखाने, तिथपर्यंत पोहोचवण्याची आणि योग्य उपचार मिळेपर्यंत भूमिका घेण्याची जबाबदारी आपल्याकडून पार पाडली जात आहे.
यावेळी औषधांचा पुरवठा कोल्हापूर राऊंड टेबल १५४ या संस्थेकडून झाला. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. धवल चौगुले आणि डॉ. सिद्धेश राणे यांनी ही औषधे मिळवून देणेकामी महत्वाची भूमिका बजावली. अमोल बुढढे यांनी याकामी सहकार्य केलं.
…रानातून येताना रस्त्याच्या कडेनं जिवंत प्राण्यांच्या शरीराला डसण्यासाठी आसुसलेल्या कानटांना (जळू ( leech, bloodsucker ) काढल्यावर रक्त थांबत नाही. बहुतेकांच्या दारावर रक्ताचे थेंब पडलेले दिसले. इथं दरीत उतरून पाणी आणणे, जनावरांना चारणे, शेतात जाणे या गोष्टींना टाळता येत नाही…सबब कानिट लागणं क्रमप्राप्त आहे ..! तरीही ही आयुष्ये थांबत नाहीत !
… अंधारात चाचपडत, भुरभुरत्या ढगातून आम्ही माघारी आलो. धुक्यातून हळुवार वाट काढताना मी स्वतःशी बोलत होतो – – अधेमधे येणारा एवढा पाऊस या सगळ्यांच्या आशेला अंकुर फुटण्यासाठी पुरेसा आहे …कुबेर इथं येण्याचं धाडस कधीच करत नाही !