मुंबई : वरळी कोळीवाडा परिसर स्वच्छ करणाऱ्या महिलांना भेटवस्तु देऊन आभा परिवर्तनवादी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर, स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आभाच्या आगामी कामाबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल चर्चा झाली.
यावेळी आभा चे राजेश मोरे म्हणाले कि, मागील दोन वर्षांपासून स्त्री मुक्ती संस्थेच्या ३५ हुन अधिक महिला कचरा जमा करणे, त्याचे विलगीकरण करून त्याचे खत अथवा पुर्नवापर करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहेत. या महिलांच्या सहभागामुळे आपला परिवार आज आरोग्यदायी श्वास घेत आहे. स्वतःच्या घरातील लेकरांना- कुटुंबातील सदस्यांना संभाळीत अगदी ७ च्या ठोक्याला या रणरागिणी कामावर हजर असतात; कुणासाठी तर आपल्यासाठी ! यांना पहिलं की कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या शेवटच्या ओळी स्मरणात येतात.
भुईत पाय रुजवून बाई आभाळभर फुलते,
देहाचाच खांबकरून अवघे घर तोलते.
महिलांसाठी कोणता एखादा दिवस असण्याची गरज नाही वर्षातील प्रत्येक दिवस त्यांचा असावा. पण या दिवसाच्या निमित्ताने वर्षभर मनात असणारी कृतज्ञतेची भावना ओठांवर आणि कृतिमध्ये यावी अशा भावना आभा संस्थेने व्यक्त केल्या.
स्त्री मुक्ती संघटनेच्या करुणा मॅडम, कविता मॅडम आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाचे कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल आभा संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.