विशाल विमल, तारुण्यवेध संघटना
खर्च फक्त ५०० रुपये । महा.अंनिस व तारुण्यवेधचा उपक्रम
दोन जानेवारी रोजी मंचरला मित्राच्या घरी बसलो होतो. सोशल मीडियावर सावित्री उत्सवाचे पोस्टर पाहण्यात आले. मुलांसाठी कुणी तरी कार्यक्रम करत असल्याचे फोटोही दिसले. आपणही एखादे सावित्रीबाईंच्या विचारकार्याचे पत्रक तयार करून शाळा, वस्ती, गावा आणि घरोघरी कार्यक्रम घेऊ शकतो, अशी कल्पना डोक्यात आली. त्वरित पत्रक तयार करण्यासाठी मेंदू कार्यरत झाला. पण ऐनवेळी पत्रक तयार कसे करणार ?कुठून छापून घेणार? हे प्रश्न होते. उद्या ३ जानेवारी सावित्रीबाईंची जयंती आहे. पत्रक तयार करून छापले तरी कार्यक्रम कुठे घ्यायचा ? कधी घ्यायचा ? कोणत्या शाळेत घ्यायचा ? शाळेची परवानगी घेतली आहे का ? हे सारेच प्रश्न समोर होते. अशी स्थिती असतानाही राज्याच्या सावित्री उत्सव एडमिन ग्रुपवर पत्रक तयार करण्यासाठी माहिती द्या, असा विनंतीवजा मेसेज टाकला. तोच मेसेज काही कार्यकर्त्यांनाही पाठवला. दहा मिनिटांमध्ये शरद कदम यांनी त्यांचा एक जुना लेख पाठवून दिला. प्रणिता वारे हीने तिच्या पुस्तकातील काही पानांचे फोटो पाठवले. प्रतीक्षा दापूरकरने सावित्रीबाई फुले यांचे काव्य आणि त्याचे महत्त्व विशद करणारे टिपण पाठविले आणि माझ्या डोक्यात जे काही होते ते मी मोबाईलमध्ये टाईप केले. अशा प्रकारे चौघांचा मजकूर पत्रकासाठी पुरेसा झाला. तो मजकूर एडिट करून पत्रक तयार करण्याची कल्पना सत्यात येणार होती.
मित्राच्या घरून अनिल चव्हाण यांच्या नवजीवन प्रेसमध्ये गेलो. त्यांना पत्रक तयार करण्याची कल्पना सांगितली. २५ टक्के मजकूर मी त्यांना लगेच टाईप करून मेल केला. पण युनिकोडमधील मजकूर श्री लिपी देवरत्न मध्ये कन्व्हर्ट करता येत नव्हता. मग आम्ही गुगलवर काही खटाटोप करून तो मजकूर श्रीलिपी देवरत्नमध्ये कन्व्हर्ट करून घेतला. त्यांनी लगेच कॉम्प्युटरवर कोरोल ड्रॉमध्ये काम करायला सुरुवात केली. तोवर मी त्यांना बाकीचा मजकूर दिला. पण तितक्यात त्यांना घरी जावे लागले . मग मीच ते पत्रक करायला कॉम्प्युटरसमोर बसलो. एकत्रित झालेला मजकूर संगतवार खाली-वर करून, एडिट करून पत्रक तयार झाले. त्याची पीडीएफ आणि इमेज करून शरद कदम, प्रतीक्षा दापूरकर यांना पाठवली. त्यांनी काही दुरुस्तीसह होकार दिला. त्या दुरुस्त्या करून ते पत्रक लगेच सोशल मीडियावरती गेले. अनेकांना ते इतके आवडले की ते अनेकांनाच्या स्टेट्सला दिसू लागले. तितक्यात अनिल चव्हाण आले. त्यांच्याकडून अजून ते पत्रक व्यवस्थित करून घेतले. त्यांनी पत्रकाची पीडीएफ करून मेल केली. पेपर दुकानातून पेपर घेतला आणि त्वरित पत्रक प्रिंट करून घेतले. दोन तासात काम फत्ते झाले. त्यानंतर तारुण्यवेध संघटनेच्या कमिटीला आणि अंनिसच्या मंचरमधील कार्यकर्त्यांना पत्रक तयार केल्याची कल्पना दिली. चूकभूलीबद्दल क्षमस्व असे कळविले.
सकाळी पिंपळगावमध्ये तारुण्यवेधचे अध्यक्ष विकास पोखरकर यांनी ग्रामस्थांना एकत्रित करून त्यांना सावित्री उत्सवाची माहिती देत पत्रकाचे वाटप केले. त्यानंतर मला त्यांनी कॉल केला. शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम घेऊ असे विकासदादा बोलला. मला घ्यायला घरी आला. आम्ही शाळेत गेलो. शाळेत गेलो तेव्हा सर्व मुले एकत्रित हॉलमध्ये बसवली होती. प्रास्ताविक, ओळख भाषण समारोप, पत्रक प्रकाशन झाले. मुलांना पत्रक वाटली. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी गावात हॉटेलला नेऊन आम्हाला चहा पाजला.
आदल्या दिवशी संध्याकाळी प्रतीक्षा दापूरकरशी तिच्या गावात कार्यक्रम घेण्यासंबंधी बोलणे झाले. तिने तयारी दर्शवली. तारुण्यवेध, महा.अंनिससह त्यांच्या स्थानिक समविचारी संस्था संघटनांची नावे बनवलेल्या पत्रकात मी मोबाईलमध्येच एडिट करून, समाविष्ट करून दिली. कार्यकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यात आष्टी (शहीद) येथील गणेश पुरा आणि नवीन आष्टी येथे कार्यक्रम केले. ३ तारखेला सायंकाळी मनिष उमरकर यांनी पत्रक प्रिंट करून आणले. कार्यक्रमाच्या आधी सायंकाळी गृहभेटी घेतल्या. सावित्री उत्सवामध्ये सांची बचत गटाच्या महिला आणि आष्टी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या समोर पत्रकाचे वाचन झाले. आणि सावित्रीबाईंबद्दल माहिती सांगितली. दुसऱ्या दिवशी ४ तारखेला जिल्हा प्राथमिक शाळा नवीन आष्टी येथे सावित्री उत्सव साजरा करण्यात आला. त्यात प्रतिक्षा दापूरकरने विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रितीका वैकुंठ हिने पत्रकाचे वाचन केले. तसेच दिक्षिका हिने फलक लेखन केले. शाळेतील कार्यक्रमानंतर प्रतिक्षा, प्रीतिका आणि दीक्षिका यांनी दुपारी साधारण ७० गृहभेटी घेतल्या. त्या प्रत्येक घरी जाऊन त्यांना सावित्री उत्सवाची माहिती दिली आणि पत्रक वाटप केले. विकास पोखरकर, विशाल विमल, प्रतीक्षा दापूरकर, मनिष उमरकर, प्रितीका वैकुंठ, दिक्षिका, अनिल चव्हाण, जगन्नाथ टेके, बबन बांगर, शरद कदम, प्रणिता वारे, विमल गणपत, बी. टी. उरकुडे, डॉ. प्रा. कपिल पाटील, दिवाकर घोरपडे, सांची महिला बचत गट, मुख्याध्यापक चौरीवार, सहाध्यापाक डोंगरे आदींच्या सहकार्याने कार्यक्रम झाले.
● निष्कर्ष :
१) दहा-बारा कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पत्रक तयार करणे, प्रिंट करणे, भाषण देणे, माहिती सांगणे, घरोघरी जाऊन पत्रक वाटणे, शाळांमध्ये कार्यक्रम घेणे या माध्यमातून सुमारे ५०० लोकांपर्यंत सावित्रीबाईंचे विचारकार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला. २) एकूण उपक्रमासाठी प्रिंटिंगसाठी जो काही पाचशे रुपये खर्च झाला तितकाच. ३) अत्यंत कमी खर्चात, कमी वेळेत, कमी कष्टात आणि ज्या ठिकाणी अधिक गरज आहे, अशा फ्रेश ५०० लोकांसाठी सावित्री उत्सवाचा कार्यक्रम करणे ही मोठी उपलब्धी आहे. ४) कौशल्य बुद्धिमत्ता धाडस केले म्हणून पत्रक तयार झाले. ५) कामाची पूर्वपार्श्वभूमी असल्याने शाळांमध्ये कार्यक्रम घेण्याची त्वरित संधी मिळाली.