आमच्या मुलांना पुस्तकातील गोष्ट म्हणजे एखादा चित्रपटच वाटतो. पुस्तकातील गोष्टी ऐकणे, वाचणे हे मुलांना खूप आवडतं. आम्ही एखादं गोष्टीचं पुस्तक वाचताना ते जर मोठ्या आशयाचं असेल तर ते आम्ही दोन भागात विभागून पुढील गोष्ट दुसऱ्या दिवशी वाचून दाखवतो. पण मुलांना तसं नको असतं. त्यांना पुस्तक कितीही मोठं असलं तरी त्या पुस्तकाच्या कथेत शेवटी काय घडतं हे जाणून घेण्याची उत्सुकता फार लागलेली असते.
आम्ही बालनागरी मध्ये ‘जमिनीवरील ग्रंथालय’ नावाचा उपक्रम घेत असतो. जमिनीवर पेपर अंथरून त्यावर पुस्तके ठेवली जातात व सर्वांनी एकेक करून ती वाचत बसायची. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी त्यातील चित्र बघून गोष्ट काय असेल याचा अंदाज घ्यायचा. एकदा असाच हा उपक्रम सुरु असतांना अर्धा तासानंतर अचानक मुले ओरडली. दादाSS, दादाss.
‘काय झालं?
दादा ! ‘पुस्तक चोरलं’, ओमशंकर म्हणाला!
कुणी नेलं?
दादा, तो पोरगा नवीन हाये. आज पहिल्यांदाच शाळेत आलाय.
(पुस्तक चोरीला जाणं! हि घटना खूप भारी वाटली, पण आधीच पुस्तकाचा तुटवडा. नेलेलं पुस्तक परत आणून दिले तर ठीक. फाटले बिटले तर? असे विचार डोक्यात आले. घटना जरी छान असली तरी पुस्तक आणि पुस्तकवाला मिळायला हवे, असा विचार करून मी मुलांना म्हणालो)
हो का? मग आता काय करायचं?
जाऊन घेऊन येवू का पुस्तक? आम्हाले त्याचं घर माहीत हाये.
बरं जा. पण त्याला मारू-बिरू नका आणि त्याला तुमच्या सोबतच घेऊन या?
हो दादा, असं म्हणून पाच दहा पोरं पळाली. तो मुलगा घरी न जाता कुठे तरी लपून बसलेला असावा. त्यामुळे तो मुलांना काही भेटला नाही. मुले बिचारी रिकाम्या हातानी आली आणि म्हणाली कि, तो काही गावला नाही दादा पण आम्ही त्याला शोधून काढतो आणि त्याच्याकडून पुस्तक पण घेऊन ठेवतो.’
काही दिवसांनी बालनगरीचा दरवाचा बसवण्याचे काम सुरू होते. त्या कामात आम्ही व्यस्त होतो. मुलांना काही काम नसल्यामुळे ती आमच्या मागे-मागे फिरत होती. दरवाजा लावण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेत होती. तितक्यात ओमशंकरला पुस्तक नेणारा मुलगा दिसला व त्याला पुस्तकाची आठवण झाली. मला काहीच न सांगता मुलं त्या मुलाला पुस्तकासाहित घेऊन आली. दादा ह्यो बघा, ह्यांनीच पुस्तक नेलं होतं.
या मुलाने नेमकं कोणतं पुस्तक नेलेलं हे पाहण्यासाठी त्याच्याजवळील मी पुस्तक घेतलं.
‘आई समान कुणीही नाही!’ असं त्या पुस्तकाचं नाव.
मला माहिती होतं कि, या मुलाला वाचता लिहिता येत नाही, मग पुस्तक त्याने का नेलं असावं? तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आई आणि मुलगा शिकार करतानाचे चित्र होते आणि आमच्या सगळ्या मुलांचे आयुष्य हे जंगलाच्या सानिध्यात असल्यामुळे कदाचित ते चित्र त्याला आवडले असावे. तो मुलगा कुणाशीही नजर मिळवत नव्हता. मी इतर मुलांना सांगितलं की, तो चोर नाही आहे, त्याला पुस्तक आवडलं होतं म्हणून त्याने ते नेलं. पण असं करायचं नाही, तुम्हाला जर पुस्तक वाचायला, पाहायला पाहिजे असेल तेव्हा मला एकदा सांगून घेऊन जा. ही पुस्तके सगळ्यांसाठीच आहेत.
मुलांना मी ते पुस्तक दिले. पुस्तक हातात पडताच सगळी मुलं त्यातील चित्र पाहत बाकावर बसली होती. चित्रे पाहतांना मुले एकमेकांशी बोलू लागली. थोड्या वेळातच त्या पुस्तकाभोवती मुलांनी खुप गर्दी केली.
माझं लक्ष त्यांकडे होतं पण मनात विचार आला. ‘पुस्तक फाटेल की काय’. त्यावर मी त्यांना ते पुस्तक आत ठेवून द्यायला सांगितले. पण मुलांच्या हातून पुस्तक काही सुटेना. इकडे साडे सहा वाजायला आलेले, बऱ्यापैकी अंधार व्हायला सुरुवात झाली होती. तितक्यात पोरांनी दादा हे पुस्तक वाचून दाखवाणा असं म्हणत माझा हात ओढू लागली. चोरीला गेलेल्या पुस्तकात नेमकी कोणती कथा आहे, ज्यात शिकारीची इतकी भन्नाट चित्रे आहेत हे मुलांना जाणून घ्यायचे होते. मला हे लक्षात आलं. मग आम्ही आहे त्या स्थितीत मुलांना गोष्ट वाचून दाखवली. सोबतच ज्या मुलाने हे पुस्तक नेले होते त्यालाही समोर बसवले.
इकडे दरवाज्याचा ठकSS ठकSS ठकSS ठकSS असा आवाज आणि जोडीला सायंकाळचा अंधार त्यामुळे शिकारीची गोष्ट अजूनच रंगली. गोष्ट संपली आणि मुलं म्हणाली, ‘दादा, लय भारी होती गोष्ट!’ उद्या अजून एकदा वाचून दाखवाल.
अनुभव लेखन: धम्मानंद
www.oveetrust.org