पुणे : मुंबई पुणे मार्गावरील भक्ती शक्ती उड्डाण पुलाखाली बीदर, औरंगाबाद व महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या भटक्या समाजातील मुलांकरिता शाळा १४ नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून अजित फाऊंडेशन संस्थेने ‘ग्रीन सिग्नल स्कुल सुरु’ उपक्रम सुरु केला. याठिकाणी बहुतांशी मुलं भिक्षेकरी असून शाळाबाह्य आहेत. या मुलांना मूलभूत शिक्षण मिळावे; या उद्देशाने भक्ती शक्ती उड्डाण पुलाखाली वास्तव्यास असलेली १०० हुन अधिक मुलांसाठी हा उपक्रम सुरु केल्याचे महेश निंबाळकर यांनी सांगितले.
अनेकदा नेहमी शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा विषय चर्चेला येतो मात्र वाढत्या शहरीकरणाबरोबर स्थलांतरित मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मोठा होताना दिसतो. परिमाणी शाळाबाहय मुलांच्या संख्येत कमालीची वाढ होते. अशी मुले सिग्नलवर भीक मागणे, खेळणी विकणे, तसेच मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा चालवण्यास हातभार लावतात. कमी वयात मुलांना जबाबदारी येऊन त्यांचे बालपण चुरगाळून जाते, या पार्श्वभूमीवर मुलांना अंक व अक्षर ओळख व्हावी; यांची अनौपचारिक शाळा महत्त्वाची आहे.
१ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, यासाठी अजित फाऊंडेशन ही संस्था गेली १५ वर्षांपासून कार्यरत आहे, यापूर्वी तळेगाव स्टेशन येथे झारी सोनार समाजातील मुलांसाठी अनौपचारिक शाळेचा उपक्रम राबवला असून भक्ती शक्ती उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणावर या उपक्रमाची गरज लक्षात घेऊन महेश निंबाळकर यांनी तात्काळ उपक्रमाची सुरुवात केली.
संस्थेने आजपर्यत ८००० हुन अधिक मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. ११० मुले आणि मुली आहेत. या मुलांना सायंकाळी २ ते ४ या कालावधीमध्ये शिकवले जाणार आहे. आज बरीचशी मुले भीक मागण्यासाठी रस्त्यावर फिरत होती. शिक्षणापेक्षा भुकेचा प्रश्न गंभीर आहे, त्यादृष्टीकोनातून कुपोषित मुलांसाठी नियमित आरोग्य तपासणी व दररोज पोषण आहार देण्याचा संस्थेचा प्रयत्न असणार आहे. या उपक्रमासाठी गिरीश तापकीर, श्रीकांत काथे, प्राजक्ता मुऱ्हे, आदींचे सहकार्य मिळत आहे. बालदिनाच्या निमित्ताने स्थलांतरित व शाळाबाहय मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, टिकावीत यासाठी संस्था विविध उपक्रम राबवणार आहे.
दररोज त्यांना मूल्य शिक्षण, मराठी, इंग्रजी, गणित, गाणे-गोष्टी, वैयक्तिक स्वच्छता आदी विषयांवर भर दिला जाणार आहे. या भटक्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आपणही स्वयंसेवक किंवा मदत करून या कार्यात सहभाग नोंदवू शकता. अधिक माहितीसाठी ९८२२८९७३८२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निंबाळकर यांनी केले आहे.







