सोलापूरच्या एस.टी.स्टँडपासून ते चार पुतळ्याच्या रस्त्यांनी जाताना मळकट कपडे,वाढलेले दाढी केस, खांद्यावर मळकटलेली चादर घेऊन दररोज हताश होऊन चालताना मला तो दिसत होता…! त्यावेळेला माझ्याकडे त्याला बघण्याशिवाय अन् लक्ष ठेवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता !
दिड एक महिन्याच्या कालावधीनंतर तुटुक मुटूक वरवरचे बोलणें झालेले. सुरवातीला विद्रुप अवस्थेत असणाऱ्या त्यांच्या कंबरेखालच्या अंगावरच्या कपड्यातून लघवी/संडासाची उग्र दुर्गंधी पसरलेली होती. वाढलेल्या विखूरलेल्या केसांच्या मध्ये रस्त्याच्या मातीच्या धुळेनं घरं केलंल ! तोंडवाटेनं पडणाऱ्या थुंक्याची दाढी-मिशावर साचलेली लाळ चादरतल्या कुबट लघवीच्या वासाने माझा श्वास केव्हाचाच शांत झालेला…
कित्येक वर्षं पडून लोळून घाण मातीचे थवे चादरीवर आणि कपड्यांवर साचुन नव वाळवंट त्यांनी अंगावर निर्माण केलंल…दिवसभर जुन्या पुन्या नाक्यापासून ते एस.टी स्टँड, पालथ घालून तो चौफेर फिरत असे. सिध्देश्वर मंदिराच्या पायऱ्या असो की दर्गाच्या दरवाज्याच्या बाहेर… तो भिक्षेकरांच्या सहवासात राहून पोटाची भूक भागवत असे.
दिवसभराच्या फिरस्ती नंतर तो शिवाजी चौकातील कोहिनुर टेक्नीकलच्या खालच्या जागेत असलेल्या शिवशक्ती हॉटेलच्यासमोर तो पडत असे. शटर बंद झाल्यावर अन् शटर उघडण्याआधी तो त्याच्या मार्गावर मार्गस्थ व्हायचा…! एस.टी स्टँडवरच्या लोकांची मने मोठी असल्याने तिथे राहणाऱ्या याचकांची मनोयात्रींची एकंदरीत खाण्यापिण्याची सोय होऊन जाते. म्हणून त्या गर्दीतून दर्दी लोक भेटत जातात !
त्याला जाणून समजून घेण्यासाठी कित्येक रात्री त्याच्या अवतीभवती काढल्या त्या दरम्यानच एका पत्रकार बधुंनी त्याचच साठी फोन केलेला. संबंधित व्यक्तीची माहिती थोडी फार कळली पण एक काळ लोटलेला होता. तो कधीकाळी सोलापूरच्या एसटी स्टँडवर लिंबू सरबतविक्री करत होता. दारूच्या वेसनेने तो पुर्णता संपलेला होता. एके दिवशी दारूच्या नशेत त्यांनी त्याच कुटूंब संपवलेल…
या घटनेनंतर एक काळ लोटलेला होता या प्रकरणातून तो शिक्षा भोगून तुरुंगातून आलेला…जेव्हा तो कारावासातून बाहेर आला तेव्हा त्याच्याकडे नातेवाईकांनी कानडोळा फिरवला. तो सैरभैर झालेला या अवस्थेत होता ! तिथूनच तो माणसांच्या गर्दीतून लुप्त झालेला होता.जेव्हा तो ठिक होऊन घरी आला. तेव्हा ही हकीकत/ घटना त्यांच्या वहिनींनी कथन केली.
बराच काळ लोटलेला या घटनेला ! असो पुन्हा मुद्दांवर येऊ…! त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करूनही तो पुन्हा तसाच वागू लागाला. खाण्यापिण्यापासून ते विडी कपड्यांपासून त्याला सगळं पुरवलं ! तसा तो मनोयात्री नव्हता. पण तो मानसिक संतुलन हारवून बसलेला होता.त्यातून पुन्हा उभारी घेणे अशक्य होते.त्याच्यावर योग्य वेळेत वेळेवर उपचार होणे गरजेचे होते.
जेव्हा कधी त्याला बोलायचा प्रयत्न करायचो.तो मला बघता क्षणी पळून जायचा किंवा गोंधळ दुष्य परिस्थिती निर्माण करून शिव्या, दगड उगारुनतो कसाबसा तिथून निसटून जायचा…२०१६ च्या दरम्यान एकदा त्याला उपचारांसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न असफल झाला. पण २०१७ च्या दरम्यान त्याच्या वाढत जाणाऱ्या उद्रेक स्वभावकडे आजारांकडे वागणूकीमूळे त्याला उपचारांसाठी श्रद्धा पुर्नवसन केंद्रात पाठवण्यात आलं. तिथून तो तीन-चार महिन्यांच्या उपचारानंतर तो पुन्हा बरा होऊन आला. घरच्या नातेवाईकांची कौन्सीलींगकरुन पण त्यांना समजून घेतलं जात नव्हतं पण प्रयत्न सुरुच होते.
मी पहिल्यांदाच एका मोठया कुटूंबाच कौन्सीलींग करत होतो. हा अनुभव वेगळा होता. शेवटी शेवटी ज्या पत्रकारांने मला फोन केलेला होता. त्यांना हा घडलेला प्रकार आणि कुटूंबाची परिस्थिती सांगून त्यांना विनंती करण्यास सांगून पणशेवटी अपयश आलं…पण काही तासभराने गल्लीतल्या लोकांनी समजूत घालून आपआपासात चर्चा घडवून त्या कुटूंबाकडे गेले. त्यांनीच पुन्हा आमची व पेशंटची पुर्णपणे आजार बरा झाला आहे का हि खात्री करूनच व्यवस्थित पडताळणी करुन त्याला घराच्या बाहेरच्या अंगणात त्याची सोय करून त्याला रहाण्यासाठी पुरेशी जागा म्हणजेच छोटस कोलारु बांधून त्याला तिथेच ठेवले !
आधी मध्ये त्याच्या घराकडे मी जात होतो. तेव्हा एकदा तो म्हणाला काम हवंय म्हणून…! गल्लीच्या बाजूला असलेल्या हॉटेलाच्या मालकाला विनंती करून त्याला कामाला लावले. दोन महिन्यांनी तो तिथून निघून गेला पुन्हा तो कुठे दिसला नाही घराच्यांकडे चौकशी केली असता.तो जुन्या मालकांकडे कामास जातो आणि तिकडेच राहतो असं समजलं तेव्हा कुठं मन शांत झालं…बराच महिन्यांनी तो मला काल संध्याकाळी एका चारचाकी गाडीवर काम करताना दिसला पैसाचा हिशोब करताना तो माझ्याकडे पहात मला आवाज देत आपल्याच मालकाच आहेया की इकडे म्हणत ” काय खाणार ” विचारता क्षणीच त्याच्या गोड स्मित हास्याने मी मलाच अनोळखी झालो होतो…! तो पुन्हा सर्वसामान्यपणे जीवन जगु लागला आहे.
आज तो सर्वसामान्यपणे व्यवहार करत आहे. चारचौघात फिरतो आहे.ज्याहाताने कित्येक वर्षे पाणी पण स्पर्श केले नव्हते ते हात आज हजारो लोकांच्या खाण्याची सोय पुरवण्यात व्यस्त आहेत ! अन् हे सगळं बघुन मी आनंदाने होरपळून गेलोय…! आशा कित्येकांसोबती सोलापूरच्या रस्त्यांने मी मनोयात्री होऊन त्याच्यात वावरत असतो नागडत असतो…! या एका गोष्टीतच आत्मिक समाधान मला मिळतं. तर अशी कहाणी बरी होण्यासाठी डॉ.भरत वाटवाणी सर आणि श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत…! यांच्या सोबतच कोल्हापूरचा माझा अमित दादा आणि रमाकांत सर तुमच्या मुळेच हे आनंदाचे क्षण मी माझ्या डोळ्यांसमोर साठवत आहे.आणि मी प्रचंड आनंदी झालायो ! त्या दिवशी तो माझ्या नजरेसमोर आला नसता तरतो आज त्याच रस्त्यावर मळकटलेली चादर, कपडे वाढलेले दाढीकेस….बरेचसे प्रश्न अजून माझ्या मेंदूच्या आरपार होत आहेत. मोठ्या आत्मविश्वासानं मी त्याला मिठी दिली…! या एका माणसाला त्याचा स्वतःचा मार्ग सापडला…मी पुन्हा शोधतोय ! मी पुन्हा हारवतोय त्या नाव नसलेल्या माणसांच्या दुनियेत…!
आतिश कविता लक्ष्मण अध्यक्ष :- संभव फाउंडेशन, सोलापूर, मो. ९७६५०६५०९८