बाहेरुन नुकताच माझी बहीण अपर्णा आणि मैत्रीण पल्लवी यांच्याशी जीवनात येणारे गतीरोधक आणि आपला असणारा वेग यावर आणि एका विषयावर चर्चा करुन नुकताच घरी परतलो होतो..घरी आल्यावर लगेच माझी मुलगी अल्विया धावत पळत आली..ती काही बोलण्याच्या आतच मी अपर्णाने गोव्याहुन आठवणीने आणलेला चाॅकलेटचा डबा व प्रिन्सेस कॅप तिला दाखवली व म्हणालो,’..अपर्णा आंटी दी..’ अल्विया काही म्हणेपर्यंत तिची आई मला इशा-याने म्हणाली..’ नंतर द्या आत्ताच तर दोन घास खायला सुरु केलय तिनं..’
मी लगेच माझ्या रुमकडे वळलो, तर आत माझी आई शहजादला म्हणजे माझ्या मुलाला ‘.. चंदनियाँ छिप जा ना रे..’ हे गाणं म्हणत झोपु घालत होती .. माझी आई रोज गाणी/लोरी म्हणुन माझ्या मुलांना झोपवत असते. मी लगेच फ्रेश होऊ जेवायला बसलो.. कडाक्याची भुक लागलेली.. भुक या विषयावर अपर्णा व अम-याला एक किस्सा सांगुनच परतलो होतो तर जेवायला सुरवात करतो न करतो तोच मला एका Unknown number वरुन एक काॅल आला. जेवताना फोन सोबतच ठेवण्याची चांगली/वाईट सवय असल्याने मी लगेचच उचललामी : हेलोपलिकडुन : सर अतिश बोलतोय..आहे का वेळ? मी : अरे भावा कुठयस?अतिश : संजय गायकवाड चौक(पोटफाडी चौक) येथे आहे..येताय का?मी : हो येतो ना अतिश : मग येताना थोडसं भात आणि पाण्याची बाॅटल घेऊन यामी : हो..सध्या जेवतोय एक दहा ते पंधरा मिंटात पोचतोअतिश : या !
मी फोन ठेवल्या ठेवल्या समोर बसलेल्या माझ्या पत्नीच्या कपाळावर आठ्या पडल्या.. आता परत हे कुठे निघाले म्हणुन ..तर माझी मोठी ताई प्रश्नार्थकपणे पाहु लागली.. मी लगेचच म्हणालो,’..पटकन थोडासा भात डब्यात किंवा कॅरीबॅग मधे दे..” मी जेवण संपवत म्हणालो,’..सिविल चौकाच्या तिथं एक मनोरुग्ण आहे ..माझा मित्र अतिश त्यांची सेवा करतो ..’पत्नीने व ताईने लगेचच भात बांधायला सुरवात केली..मी अतिशला त्या नंबर वर पुन्हा फोन लावला व विचारलो की भाजी-चपाती वगैरे आणु का? तेव्हा फक्त भातासोबत कालवण आणि पाण्याची बाॅटल एवढच बास असं त्याने सांगितलं .. माझं जेवण संपलं .. मी डबा घेऊन निघणार इतक्यात आई म्हणाली,’..एका नातलगाचं निधन झालय..पाहुण्यांच्या घरातील कुणी ना कुणी चाल्लय मग आपल्याकडुन मी जाते .. मला पटकन चाळीत सोड..’ मी एक क्षण विचार केला .. शुगर,थायराॅईड, सांधेदुखी नी गुडघ्यांचा त्रास व वेळीच घ्याव्या लागणा-या गोळ्या ती कसं मॅनेज करेल?.. पण शेवटी ‘आई’ म्हटलं की सगळं मॅनेज होतं ..या विचाराने तिला लगेच तैयार व्हायला सांगितलं व तिला पाहुण्यांच्या घरी सोडुन रामवाडी ते पोटफाडी चौकास निघालो..मग रंगभवन जवळ पुन्हा अतिशचा फोन आला मी लगेचच उचलुन ‘दोनच मिन्टात पोचतोय’ हा सोलापुरी डायलाॅग मारला.. जवळपास ३० मिनिटानंतर मी तिथे पोचलो होतो.
पोटफाडी चौकातुन आपण सिव्हिल हाॅस्पीटल ला जाणा-या रस्त्याजवळ हाॅस्पिटलच्या भिंतिलगतच पायाने अधु असलेला, फाटके कपडे, वाढलेल्या दाढीमिशा, वय ३०-३५ च्या दरम्यान असेल कदाचित.. भिंतीकडे तोंड करुन बसला होता जणुकाही त्याने जगाकडे पाठच फिरवली होती.. मी गाडीवरुनच ‘साॅरी साॅरी उशीर झाला’ म्हणत उतरलो ..तेव्हा अतिश भात नको फक्त पाण्याची बाॅटल द्या म्हणाला कारण कृष्णा’ने भजी खाल्ल्या होत्या आणि आता काही खाणार नाही हे अतिश ला माहीत होतं ..कृष्णा हे त्या मनोरुग्नाचं नाव..अतिशनेच ठेवलेलं..कारण त्याचं खरं नाव कुणालाच माहीत नाही..आपण वीस गोष्टी त्याला बोलल्यानंतर मग तो काहीसा पुटपुटतो .. गावाचं नाव घेत नाही पण विचारल्यावर बस्तर (बिहार मधील) या गावचं नाव घेतो.. त्याला रेल्वेतुन कुणीतरी फेकुन दिलं होतं म्हणे..तेव्हापासुन पायाने पांगळा होऊन आणि अनेक गोष्टींचा डोक्यावर परिणाम होऊन तो गेले अनेक दिवस सोलापुरातच आहे,अशी माहीती मिळाली.
अतिश सोबत बाळु होता .. त्याने कृष्णाला भजी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला ..तो भिंतीकडेच वळायचा सारखा.. माझी ओळख अतिशने कृष्णाशी करुन दिली..मी ही त्याला हिंदीतुन हेलो केलो.. आम्हा दोघांनाही काहीच कळलं नसेल की आम्ही काय करतोय..भावनाओंको समझो.
मग अतिश मला काही मनोरुग्णांचे फोटो दाखवु लागला इतक्यात समोरुन एकजण पॅन्टशर्ट घातलेला पण लटके-झटके देत .. कानाला हेडफोन व एक स्मार्ट/अँड्रोईड फोन वर गाणे ऐकत येत होता .. त्याला पाहुनच मी ओळखलं होतं की तो तृतीयपंथी आहे.. आम्ही तिघेही त्याच्याकडे पाहु लागलो तोच अतिशने त्याला ‘ओ शाहु ..या की इकडं ‘ म्हणुन आवाज दिला.तो आला.अतिशने त्याचा हालहवाला विचारुन माझी ओळख करुन दिली की हे आमचे सर आहेत,पोलिसात आहेत( अतिश ला मी मेसेजमधे म्हणालो होतो की सर म्हणु नकोस म्हणुन,तरी त्याने तीच ओळख करुन दिली) तसं त्याने कानातुन हेडफोन काढुन मान वैगरे हलवुन मला स्माईल दिली..एखाद्या तृतीय पंथीशी जवळुन बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ होती…,तसा मी २०११ मधे कोर्सला असताना दौंडवरुन रेल्वेतुन येताना बरेचसे तृतीयपंथी भेटायचे ..योगायोगाने एक तृतीयपंथी दोन-तीन वेळा भेटला होता .. तो यायचा टाळ्या पिटत, मी दहाची नोट काढुन देत असे तो दुआ देऊन निघुन जायचा मग एकेदिवशी माझ्या मनात काय आलं माहीत नाही .. सोलापुरला परत असताना तो परत आला आणि मी अख्खी पाकीट त्याच्यापुढं उघडी केली आणि पाहीजे तेवढे घे अशा इशारा केला..दहा पन्नास शंभर पाचशे अशा मिळुन जवळपास दोनेक हजार रुपये होते त्यात ..मग त्या तृतीयपंथी ने मला एक स्माईल दिली आणि त्यातली फक्त दहाची नोट बाहेर काढुन घेतली माझ्या गालावरुन हात फिरवुन पुन्हा दुआ वगैरे देत निघुन गेला..एवढीच ओळख तृतीयपंथी बद्दल माझी. …
पण आज अतिशमुळे हा योग आला.. अतिशने सांगितले की हे तृतीयपंथी च्या एका विंग चे अध्यक्ष आहेत .. पोलिस, राजकारणी ते इतरधंदे करणा-या सगळ्यांशी यांची चांगलीच ओळख आहे..आणि काही कारणास्तव किंवा पैसे मिळवण्यासाठी तरुण कसे तृतीयपंथी बनु लागलेत आणि आतापर्यंत यांनी जवळपास ५० तरुणांना हिजडा होण्यापासुन कसं परावृत्त केलय याचे अनेक किस्से रंगले .. भारतातील जवळपास सर्व देवस्थान ला दर्शनाला गेल्याचे शाहु अभिमानाने सांगत होता .. समाजकारण कसं असावं .. राजकारण कसं असावं.. रेल्वे पोलिस अर्थात RPF नाईट ड्युटी करत नसुन ती ड्युटी आम्ही हिजडे लोक करतो, आमच्यामुळे चो-या कमी होतात असंही तो पोटतिडकीने सांगत होता .. मला तृतीयपंथी असल्याचा अभिमान आहे, आम्हाला ही समाजात स्थान हवं यासाठी आमची संघटना काम कशी करते व संघटनेतलं काही प्रमाणात होणारी एखाद्याची लबाडीही सांगायचं तो विसरला नाही..त्याने नवी जिंदगीला ला नवी जिंदगी हे नावं कसं पडलं यापासुन फाशीकंदिल सोलापुरात कुठं होतं तेही सांगितलं .. खरं तर सोलापुरात इतके वर्ष राहुन पहील्यांदाच मला ही माहीती मिळत होती .. त्यावर तो म्हणाला माझे आजोबा जवळपास शंभरी पुर्ण केले आहेत त्यांच्याकडुनच आम्हाला ही माहीती मिळते.
पुढे विषय वाढणार तोच इतका वेळ पाणी नको म्हणणारा आणि अतिशने झाकण उघडुन तोंडाजवळ लावलेली पाण्याची बाॅटल नाकारणारा व इशा-याने झाकण लावुन ठेव म्हणणा-या कृष्णाने बाटली उघडुन जवळपास एका दमात ८०% पाणी पिऊन संपवलं होतं, तेव्हा अतिश म्हणाला ‘हा एक थेंब पण पाणी सांडणार नाही पहा.. कारण लोकं खायला देऊन जातात पण पाणी कुणीच देत नाही सहसा यांना’.. मळकटेल्या हाताने तोंड पुसत कृष्णा ने परत भजीच्या पिशवीत शोधाशोध करुन संपुर्ण बाटली संपविली होती.. शोषुन पाणी पिल्याने बाटलीचे दोन्ही भाग चिकटले होते.. तो जणु हेच दाखवत होता की पहा या समाजात आम्ही असच एक दिवस शोषिले जाणार आहोत..पाणी पिऊन झाल्यावर तो तिथे आडवा झाला .. शाहु त्याच्या सारख्या इतर दोघा-तिघा मनोरुग्नांबद्दल माहीती देत होता .. पण अतिश ला सगळ्यांची नावं माहीत होती..त्यांच्यातलं बोलणं ऐकुन खरच एका वेगळ्या जगात वावरतोय असच वाटत होतं ..
बाळुच्या गाडीची चावी कृष्णाला खायला देताना तिथेच कुठेतरी पडली होती .. सार्वजनीक दिव्यांचा उजेड होता तरी सापडत नव्हती आणि आम्ही उजेडात परत मोबाईल टाॅर्च लावुन शोधु लागलो .. सापडेना .. आम्ही पायाने माती सरकवुन पाहत होतो तर शाहु खाली बसुन हाताने माती उकरुन पाहत होता .. आणि शेवटी शाहुला चावी सापडली ती गाडीच्या हँडललाच अडकुन पडली असताना.. चावी देत तो म्हणाला,’आपल्याकडेच असतं हो सगळं पण आपण उगच हिकडं तिकडं धावतो..’ तिथे जवळपास पाऊणतास आम्ही बोलत थांबलो होतो .. इतक्यात घरुन मला पत्नीचा फोन आला येताना विक्स वेपोरब आणण्यास सांगितले.. मी पंधरा मिन्टात आणतो म्हणालो .. शाहु कृष्णाला थोडसं बोलुन सर्वांचा निरोप घेऊन निघणार इतक्यात मी त्याच्या पुढे हात करुन म्हणालो,’ भारी वाटलं भेटुन..पुढेही भेटत राहु’..त्याने मला शेकहँड केलं..पहील्यांदा एका तृतीयपंथी ला शेकहँड केला .. तो स्पर्श माणसांसारखाच होता ..तो निघणार तेवढ्यात मी त्याचे खरे नाव विचारले तर तो एका लहान मुलाप्रमाणे म्हणु लागला की माझ्या मम्मी-डॅडीनीं माझं नाव शाहु ठेवलय पण तृतीयपंथी समाजात प्रवेश केल्यानंतर गुरुंनी माझं नावं सत्यभामा ठेवलय,असं म्हणुन लगेचच त्याने त्याच्या नव-याचा फोटो दाखवला .. मग माझी नजर त्याच्या मंगळसुत्राकडे गेली .. तो सर्वांची रजा घेऊन निघाला ..कारण नुकताच तो एका HIV positive तृतीयपंथी ला hospitalized करुन, त्याच्या वैयक्तिक दुस-याकामासाठी निघाला होता.
तो गेल्यावर अतिशने मला इतर मनोरुग्णांना भेटायला जायचे आहे म्हटल्यावर मी लगेच तैयार झालो मग आम्ही रंगभवन-होम मैदान-मार्केट चौकीपासुन शाहजहुर दर्ग्याच्या बाजुला असलेल्या वनवाटीकेच्या संरक्षण भिंतिच्या बाजुला आलो… तिथे पदपथावर एका मळकटलेल्या गादीवर अंग चोरुन झोपलेला,पठाणी पायजामा शर्ट घातलेला,पांढरी दाढी असलेला जवळपास साठीतला म्हातारा झोपलेला होता,तो म्हणजे **कर ..(मी नाव यासाठी घेत नाही की त्यांचे नातेवाईक सोलापुरातच एका मध्यमवर्गीय कुटुंबातले असुन सरकारी खात्यात चांगल्या पदावर आहेत)… अतिशने आवाज दिला ,’ओ ..**कर, एका हाकेतच अतिश ला ओळखत तो ऊभा झाला मग लगेचच अतिश म्हणाला, ‘हे पहा हे आमचे सर आहेत,तुम्हाला भेटायला आलेत’ (अतिशने पुन्हा सर म्हणुनच माझं introction केलं) त्यांनी मला नमस्कार केला .. त्यांना भेटण्यापुर्वी अतिशने मला त्याची हिस्टरी सांगितली होती,जी त्या माणसाने कित्येक वेळा विचारल्यानंतर अतिशला दिली होती,की तो मुंबैत वरळीला चाळीत रहायचा,त्याच्या दोन खोल्या त्याच्या हडपुन याला हकलुन दिले,वगैरे याबाबत तो बोलायचा म्हणे…मग अतिशने माझ्यासमोर पुन्हा तेच प्रश्न विचारले त्याने तीच उत्तरं दिली .. पण आता तो शेळगीत रहायला होता असही सांगत होता .. मी आणलेला डबा अतिशने त्याला खायला दिला,त्यांनी बाजुला जाऊन डबा उघडुन कॅरीबॅग ची गाठ सुटत नाही हे पाहुन कॅरीबॅग फाडुन भात खायला सुरवात केली .. त्याचं शिक्षण चांगलं झालेलं असुन हस्ताक्षर ही सुंदर असल्याची माहीती अतिश देत असताना तिघे दोन गाड्यांवर आले व आम्ही त्या मनोरुग्णाची चेष्टा तर नाही करत ना हे पाहु लागले..अतिश लगेचच ऊठुन **कर बद्दल त्यांना काही माहीती आहे का? असे विचारल्यावर त्यांनी **कर बद्दल वरील माहीती दिली होती..पण **कर पहील्यापासुनच विक्षिप्त आहे अन् असाच भटकत फिरतो यामुळे घरच्यांनी सोडुन दिलय व त्याचे भाऊ शहराच्या मध्यठिकाणीच राहतात अशी माहीती दिली ..अतिश आता थोडासा समाधानी झाला होता कारण या मनोरुग्णांना त्यांच्या स्वकियांच्या हातात परत देण्याचा विडाच जणु त्याने उचललाय..कारण नुकतच त्याने सिद्धेश्वर मंदिराजवळ असच जीवन जगणा-या एका स्त्री ची भेट त्याने त्यांच्या घरच्यांशी घालुन दिली होती..आमची चर्चा नंतर मनोरुग्णांना आंघोळ घालुन,दाढी बनवुन,चांगले कपडे देण्याइतपत न राहता ती एका एण्ड पर्यंत जायला हवी यावर झाली..ते तिघे निघण्यापुर्वी अतिशने स्वत:ची,बाळुची नी माझी पोलिस म्हणुन ओळख करुन दिली ..ते आपापल्या मार्गाने निघुन गेले..या सर्व चर्चेपासुन अलिप्त असलेला **कर भात संपवत बसला होता.
मग आम्ही त्याचा निरोप घेऊन भगवान ला भेटण्यासाठी पार्क स्टेडीयमच्या गाळ्यांकडे वळलो..आंबेडकर चौकात आल्यावर काही युवकांनी अतिशला हाक दिली..अतिश त्यांच्याकडे गेल्यावर मी बाळुशी बोलु लागलो ..इतक्या वेळेत बाळुचं आणि माझं बोलणच झालं नव्हत..फक्त बाळु एवढच अतिशने बोलल्यामुळे तेवढच माहीत होतं.. मी पुर्ण नांव विचारल्यावर बाळु रणदिवे असे सांगितले मग मी माझं नाव सांगितल्यावर तो आधीपासुनच मला ओळखत असल्याचे सांगु लागला ..मी,माझ्या एकांकिका आणि माझी संस्था अस्तित्व मेकर्सचे कार्यक्रम त्याने पाहील्याचे सांगितले आणि माझी अल्विया खुप cute असल्याचे सांगायचंही तो विसरला नाही .. आयला किती छोटय ना जग.
अतिश आल्यानंतर आम्ही आर्चिज गॅलरीच्या बाजुला दोन तीन गाळे सोडल्यावर अंधारात मांडी घालुन बसलेला,दाट दाढी असलेला आणि गुटखा चघळत बसलेला भगवान’ भेटला..अतिशला त्याने ओळखले पण लगेचच कधी भेटलो हे त्याच्या लक्षातच येईना..इथेही माझी ओळख सर म्हणुनच केली गेली..त्याचं हसुन बोलणं मला एका लहान मुलाप्रमाणे वाटलं,छान मराठी बोलत होता..तो मुळचा अक्कलकोटचा पण गेली कित्येक वर्ष याच ठिकाणी वावरतो आणि मग शेजारी झोपलेली व्यक्ती कोणय विचारल्यावर मित्रय म्हणाला पण नाव माहीत नाही..आम्ही त्या व्यक्तीला उठवलं..त्याने नाव सांगितलं..नागोबा..तो व्यवस्थित बोलत होता..बहुतेक त्याला दारुचे व्यसन असावे..त्याने लगेचच पैसे मागितले .. मी देऊ का म्हटल्यावर अतिश म्हणाला मनोरुग्ण कधीच पैसे मागत नाहीत.. हा त्याचाअनुभव ..
पुढे आम्ही सातरस्त्याला निघालो,इंडिया टी समोरील गाळ्याजवळ कल्लप्पा याला भेटायला ,पण तत्पुर्वी अश्वथ काॅम्युटर समोर सोलापुरचा ओशो भेटला..हे ही नाव अतिशने त्या व्यक्तीला दिल्याचे समजले .. त्या व्यक्तीच्या चेह-यावर तेज होत..पण अंगावर फाॅरेनरसारख्या अकवलेल्या बॅगा,त्याही त्याने हाताने शिवलेल्या,मागे एक दांडुका ठेवलेला ,जवळपास २५-३० किलोचं ओझं असेल बॅगांमधे..मग अतिश ने सांगितलं की तो मनोरुग्ण नाही..विजापुर वेशेतील लोकं त्याला खुप मानतात म्हणे..पैसेही देतात..आणि त्याच्याकडे जवळपास पाऊणे दोन लाख रुपये मिळाले होते म्हणे आणि ते समाजातल्या कुणीतरी चांगल्या व्यक्तीने ओशो च्या नातेवाईकांना देऊन टाकले होते असे अतिश म्हणाला..आणि ओशो ला राग आला तर तो दांडुका जमिनीवर आपटत जातो वगैरे .. अशा मनोरुग्ण किंवा रात्री फिरणा-या माणसांची सगळी माहीती अतिश कडे होती,हे पाहुन हा माणुस किती जिद्दीने या कार्यासाठी धडपडतोय हे दिसलं .. ओशो फक्त इशा-याने प्रश्नांची उत्तरे देत..मिस्किल हास्य करत निघाला त्याच्या वाटेने .. माझ्या मनावर त्याच्या चेह-यावरील त्या तेजाची छाप सोडुन..
गाडीवर जाणा-या एकाने अतिशला चालु दे तुमचं काम असं सांगुन शुभेच्छा देऊन निघुन गेला ..रात्रीचे जवळपास १२ वाजत आले होते ..आम्ही इंडिया टी समोरील गाळ्याजवळ आल्यावर आवाज दिल्यादिल्या कल्लप्पा उठला .. पण जागेवरुन हलला नाही..सेम इतरांसारखाच ..पण हा फक्त मानेनेच उत्तर देत होता..तो कुठुन आलाय कुणालाच माहीत नाही..त्यांच्या खायची व्यवस्था कशीबशी होत असते..यांच्यासाठी काय करायला गेलो तर कोर्टातुन परवानगी आणा,ओळखपत्र आणा,माहीती आणा,नातेवाईक आणा असे अनेक प्रश्न हाॅस्पीटल व प्रशासन विचारत असल्याचही कळलं .. कसं असतं ना.. वाईटाला सगळे येतील पण चांगल्या कामात किती जण येतात ..प्रश्नचय ..
सव्वा बारा होत चालले होते.. अतिश म्हणाला..कांबळे नावाचा एक धिप्पाड मनोरुग्ण येत असतो याच रस्त्याने पण त्याचं नेमकं ठिकाण नसतं म्हणुन वाट न पाहता आता निघायचं ठरलं .. एक माणुस एक दिवसा आड अशा मनोरुग्नांसाठी नाहीतर आपल्या सारख्याच माणसांसाठी झटतोय..त्याचं नाव फेसबुकवर अतिश कविता लक्ष्मण या नावाने परिचित असलेला एक उमदा तरुण.. शेवटी सातरस्त्याला आल्यावर आम्ही आमच्या मार्गाने जायचं ठरवलं..निघालो.. सोबत या दोन-एक तासात अनुभवलेले जीवन पल्लवी, अपर्णा, आई, अल्विया, पत्नी, ताई, कृष्णा, शाहु, **कर, भगवान, सोलापुरचा ओशो, कल्लप्पा, बाळु आणि अतिश… कायम स्मरणात राहतील.
घरी जाताना हुमा मेडीकलमधुन विक्स वेपोरब घ्यायचं विसरलो नाही … कारण सर्दी झालीय ना माझ्या मुलांना..धन्यवाद अतिश कविता लक्ष्मण मला जीवनाचा हा ही पैलु दाखविल्याबद्दल..!!!
–इम्तियाज़ मालदार