पुणे : रेल्वे स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील बालतस्करी, बाल लैंगिक शोषण, बाल हिंसा, बाल भिक्षेकरी, काम करणारी मुले व इतर काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके व विधि संघर्षग्रस्त बालकांच्या सामाजिक पुनर्रएकात्मीकरण करण्यासाठी रेल्वेस्टेशनच्या परिसरात समुपदेशनाकरिता बालस्नेही कक्ष बनवण्यात येत आहे.
बालकांचे अधिकार अबाधित राखण्याकरिता बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ आणि पोक्सो २०१२ कायद्यामध्ये करण्यात येणारी प्रक्रिया हि बालस्नेही वातावरणात झाली पाहिजे याबाबत सूचित केले आहे. सदर बाबीचे महत्व लक्ष्यात घेऊन होप फॉर दि चिल्ड्रेन फौंडेशन हि सामाजिक संस्था २०१९ पासून बालकांसोबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांना बालस्नेही बनण्याकरिता सहाय्य करीत आहे. याद्वारे बालस्नेही संरचना, प्रक्रिया, मानसिकता, संसाधने आणि समन्वय कसा असायला हवा याबाबत योगदान देत आहे.
सदर बालस्नेही कक्ष रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक कडे जाणाऱ्या मुख्य द्वाराजवळ आत जाताना उजव्या बाजूस बनविण्यात आलेले आहे. सदर बालस्नेही कक्ष्याचे उद्घाटन दिनांक २९ एप्रिल रोजी मा. रेणू शर्मा, मंडळ रेल्वे व्यवस्थापक यांचे हस्ते करण्याचे नियोजन आहे.
याअंतर्गत बालकांची प्रकरणे बालस्नेही पद्धतीने हाताळणे करिता संबंधित यंत्रणा व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गरजेनुसार बालकांसोबत काम करणाऱ्या इतर यंत्रणांची व सामाजिक संस्थांची मदत घेऊन पुणे रेल्वे स्थानक हद्दीतील बालकांकरिता संरक्षणात्मक व बालस्नेही वातावरण निर्माण करण्यात येणार आहे.