रत्नागिरी : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यँत पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व राजापूर तालुक्यात राबवण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, रत्नागिरी – लांजा या संस्थेने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वाडी-वस्तीवर जाऊन वतीने विविध योजना लोकांना समजावून सांगितल्या.
हेरीटेज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल जावडे (नियोजित पब्लिक स्कुल), प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे, ता. लांजा जावडे, ता.लांजा, जि.रत्नागिरी (निवासी शाळा ) या शाळा आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजापर्यंत पोहोचण्याकरिता महाराष्ट्र दिनी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केला. त्यानुसार समाज कल्याण रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त एस. एस. चिकणे यांनी सर्व शाळा, ग्रामपंचायतींना सदर उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते.
हेरीटेज संस्थेने शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या शिक्षकांच्या सहकार्याने केली. केवळ शाळांमध्ये योजनांची माहिती पत्रके न वाचता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या वस्तीवर जाऊन त्यांना सर्व योजना समजावून सांगण्यात आल्या.