ट्रेक क्रमांक : १३ सुधागड
गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेच्या पुढाकाराने रविवारी (दि. १३) पाली जवळील सुधागडचा ट्रेक झाला. गडाचे मूळ नाव भोरप गड होते, नंतर शिवरायांनी सुधागड असे ठेवले. विशेष म्हणजे स्वराज्याची राजधानी म्हणून शिवरायांनी याही गडाचा विचार केला होता. या महत्वाच्या गडाचा पुण्यातील आम्ही पन्नास जणांनी ट्रेक केला. मूळ नियोजन पनवेलजवळील कर्नाळा किल्ला ट्रेकला जाण्याचे होते, पण दोन दिवस अगोदर समजले की किल्ल्यावर काही काम सुरू आहे, त्यामुळे तिकडे जाणे रद्द करून त्वरित सुधागडचे नियोजन केले. कर्णाला ट्रेकसाठी 2 दिवसात 50 जणांची बस बुक झाली. ट्रेकचे ठिकाण बदलले तरी कुणीही रद्द झाले नाही, हे विशेष !
पुण्यातून सकाळी सहा वाजता निघून सुधागड जवळील रामवाडी गावात बोचरी थँडी, थंडगार वारा अंगावर झेलत साडेनऊ वाजता पोचलो. इथे रस्त्यावरच वडाच्या झाडाखाली उभे राहून चहा, नास्ता केला आणि पुढे गडाच्या पायथ्याशी मार्गस्थ झालो. साडेदहा वाजता गड चढायला सुरुवात केली. खरे तर उन्ह वाढले होते, उशीर झाला होता, त्यामुळे दमछाक होणार हे लक्षात आले आणि तसे झाले ही ! मात्र या दमछाक होण्याला काही जण अपवाद ही ठरले. किल्ले चढाई करून फार दमछाक होत असेल तर तब्येतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असा संदेश जेव्हा ट्रेक देतात तेव्हा खरोखरच जीवनशैली, आहार, व्यायाम या गोष्टी मनावर घेण्याची गरज आहे, असे वाटून जाते. तसे सुधागड ट्रेकमुळे वाटून गेले. तरी एक गोष्ट बरी की हा गड वनराईने अच्छादलेला आहे. पायथा ते माथा हे अंतर तसे कमी आहे, पण जागेवर सरळ चढाई असल्याने दमछाक होते. अनेक ठिकाणी दगडधोंडे आहेत, काही ठिकाणी पायऱ्या, ग्रील आहे, त्यामुळे चढाईला मदत होते.
गडावर विस्तीर्ण अशी दोन पटारे आहे. पहायला तलाव, वाडा, मंदिर, चोरवाट विहीर, पाण्याच्या टाक्या, चोर दरवाजा, हत्ती माळ, धान्याची कोठारे, तटबंदी, टकमक टोक, गोमुखी महाद्वार आदी गोष्टी आहेत. पण त्यासाठी किमान ३ तास हवेत. आमच्यातील दहाबारा जण दीड वाजता वर पोचले. शेवटचा ग्रुप गडावर अडीच वाजता पोचला, तोवर अगोदर आलेल्यांनी गडावरची ठिकाणे पाहून घेतली. मग आम्ही सर्वांनी सचिवांचा वाडा येथे जेवण केले. जो गड चढायला आमची दमछाक झाली, तो गड डोक्यावर पन्नास जणांचे जेवण घेऊन दोघेजण आमच्या अगोदर चढले होते. खरे तर ऐनवेळी कर्णाला ट्रेक रद्द करून सुधागडला जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था कशी होणार याची चिंता होती, पण राजू पाथरे आणि सचिन मुंडे (रामवाडी) यांनी ही चिंता मिटवली. वेळेत, चवदार आणि अत्यन्त कमी दरात घरगुती जेवण नास्ता उपलब्ध करून दिला.
जेवण झाल्यावर ओळख, गाणी, डान्स, स्वागत, सत्कार झाला आणि साडेचार वाजता आम्ही खाली निघालो. जो किल्ला चढाईला चार तास लागले, तो खाली उतरायला दीड तासच लागला. पण खाली उतरताना पाय लटपटत होते. एकमात्र खरे की दमछाक झाली. पाय लटपटले तरी थोड्या विश्रांतीनंतर आतून प्रसन्न वाटतं आणि पुढील ट्रेकचे वेध लागतात. खाली आल्यावर थोडी विश्रांती घेऊन बसमध्ये बसलो आणि सात वाजता निघालो. हायवेला खालापूरच्या पुढे खूपच ट्राफिक होती. त्यामुळे त्यात दीड तास गेला. पुण्यात पोचायला रात्री साडेबारा वाजले. तेथून पुढे घरी जायला अर्धा-एक तास लागला.
जेवण, नास्ता, चहा, प्रवास आणि अनुषंगिक खर्च केवळ ट्रेकर्सकडून घेतला जातो. संयोजक सामाजिक दृष्टिकोन ठेवून सेवाभावी पद्धतीने ट्रेकिंगचे आयोजन करतात, कोणताही नफा मिळवत नाहीत. दर महिन्याला ट्रेकचे आयोजन केले जात असून पुढील ट्रेकमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 7276559318 (विशाल विमल), 7385752721 (अरिहंत अनामिका) या नंबरवर स्वतःचे नाव मॅसेज करून ठेवावे. पुढील ट्रेकचे नियोजन कळविले जाईल.
संयोजक :
विशाल विमल, अरिहंत अनामिका, संदीप चौधरी, भीमराव येरगे, नम्रता ओव्हाळ, सुरेश इसावे, सुभाष वारे