‘समाजकार्य’ करताना काही गोष्टी या एकट्याने होतात, पण अनेक गोष्टी समूहानेच घडून येतात. अनेकदा ‘समाजकार्य’ म्हणजे ‘दानकार्य’ असा अनेकांचा समज होतो.
पण मुळात समाजातील विविध समस्या,विविध विषय, नवीन संशोधन किंवा इतर आधुनिक कार्यपद्धती यावर शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्या विषयांवर, समस्यांवर काम करण्यासाठी स्वतःला आणि आपल्या सोबतच काम करणाऱ्या किंवा आपल्यावर अवलंबून असणाऱ्या समूहाला / व्यक्तीला पूर्णपणे स्वावलंबी किंवा सक्षम करणे म्हणजे समाजकार्य होय. समाजकार्यचा कणा हा नेहमीच त्या कार्याला पुढे नेणारा समूह असतो.
समाजकार्य करताना मूळात आपल्याला का करायचे आहे किंवा आपण का करतो आहोत? हा प्रश्न ह्या वाटेवर आपल्याला पडणे गरजेचे आहे.
समाजकार्य केल्याने समाधान/ आनंद मिळतो म्हणून ते करत आहोत?
कि…
समाजाची प्रस्थापित बैठक, त्यातील प्रश्न, प्रबोधन यातून नवनिर्मिती करून समाजाची अजून प्रगल्भ मानवीय जडणघडण व्हावी हा आपला हेतू आहे का ?
कि…
समाजकार्याच्या माध्यमातून पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी इत्यादी गोष्टी मिळवण्याची आकांक्षा आहे का?
समाजकार्य हा विषय सुद्धा एक तांत्रिक आणि शास्त्रीय विषय आहे. त्यातील इतर विषयांचा अभ्यास देखील तितकाच गरजेचा आहे. त्यामुळे त्याला गेल्या अनेक वर्षात व्यावहारिक स्वरूप आले आहे. पण डॉक्टर, इंजिनिअर या क्षेत्रात काही वेळा लोक आवड नसताना शिक्षण घेतात, तसे समाजकार्याचे नाही. इथे कुणीही जबरदस्तीने येत नाही किंवा नाईलाजास्तव काम करत नाही. इथे काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वेच्छेने या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेते.
आता हा प्रश्न पडतो कि समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचे घर कसे चालते?
या क्षेत्रात काम करणारे लोक एक तर पूर्णवेळ समाजकार्य करतात किंवा अर्धवेळ स्वतःचा इतर व्यवसाय, नोकरी संभाळून समाजकार्य करतात. अर्धवेळ समाजकार्य करणाऱ्या लोकांचा आर्थिक प्रश्न काही अर्थी सुटलेला असतो.
पूर्णवेळ काम करणाऱ्या लोकांमध्ये जे लोक एनजीओ, ट्रस्ट किंवा इतर सामाजिक संस्थांमध्ये काम करतात जिथे त्यांना केलेल्या समाजकार्याचा मोबदला मिळतो त्यांचा ही काही प्रमाणात आर्थिक प्रश्न सुटतो.
आता राहिले पूर्णवेळ समाजकार्य करून फार काही अर्थार्जन नसलेले लोक, त्यांचे व्यवहार कसे चालत असतील?
(भांडवलशाही चा उदय झाल्या पासून व्यवहारात तर हे जग निव्वळ पैशावर सुरु आहे, ज्याचे सोंग आणता येत नाही)
जर त्या व्यक्तीं वर स्वतःचीच आर्थिक जबाबदारी असेल, तसेच त्याच्या गरजा ही कमी असतील तर कमी अर्थार्जनात देखील त्यांचा आर्थिक प्रश्न सुटतो किंवा काही वडिलोपार्जित संपत्ती असेल तरी देखील सुटतो.
जर त्या व्यक्तींवर कुटुंबाची जबाबदारी असेल पण कुटुंबात कुणी एक किंवा एका पेक्षा जास्त स्थायी अर्थार्जन करणारे लोक असतील तरी देखील सुखासुखी अथवा रडतकुडत त्यांचा ही आर्थिक गाडा सुरु राहतो.
पण जे लोक पूर्णवेळ समाजकार्य करतात, समोरून पाहता ते काहीच अर्थार्जन करत नाहीत किंवा ते आहे असे सांगत नाहीत, त्यांच्यावर घराची ही पूर्ण जबाबदारी आहे आणि त्यांच्या घरात कुणी अर्थार्जन ही करत नाही, ते लोक काही न खाता-पिता समाजकार्य करतात का मग? ते बिनपैशाने घर चालवतात का मग? असा प्रश्न अनेकांना पडत असेल.
ह्याचे उत्तर आजच्या काळात ‘नाही’ असे आहे. सामाजिक कार्यात स्थायी नोकरी न करता देखील असे अनेक कायदेशीर किंवा बेकायदेशीर मार्ग असतात जिथून गावबोभाटा न करता देखील अर्थार्जन होत असते. ज्यात बऱ्याचदा सामाजिक कार्यकर्ते स्वनुकंपामुळे (self pity) किंवा निव्वळ स्वतः भोवती एक वलय तयार व्हावे म्हणून ही गोष्ट लपवतात. त्यामुळे पूर्णवेळ समाजकार्य करणारे लोक ते काम करून समाजावर किती उपकार करीत आहेत असा भास सार्वमतात तयार होतो. (मानसशास्त्रीय दृष्ट्या ही त्या व्यक्ती किंवा समूहाची मानसिक अवस्था आहे, ज्यात उपकारातून सुखावण्याचा किंवा समाधानाचा भाव तयार होतो)
मुळात वर म्हंटल्या प्रमाणे, कोणत्याही प्रकारचे समाजकार्य करणारी व्यक्ती ते काम स्वेच्छेने निवडत असते. मग ते पूर्णवेळ करायचे कि अर्धवेळ ही त्यांची व्यक्तिगत आवड-निवड असते.
मग अर्धवेळ समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची ते काम करण्याची इच्छाशक्ती कमी असते का ! त्यांच्या कामात ती गुणवत्ता नसते का ! त्यांचे काम पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्या इतके मोलाचे नसते का ! कि या गोष्टी परिस्थिती प्रामाण्य असतात ! (ह्याचे उत्तर आत्मनिरीक्षण केले कि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सापडेल)
सामाजिक क्षेत्रात काम करताना हे दिसून येते कि, समूह किंवा संस्थेद्वारे जेव्हा असे समाजकार्य घडत असते तेव्हा, एक तर संपूर्ण समूहातील अनेक लोकांना चांगले काम करण्याची संधी मिळते व त्या सोबत तशी प्रसिद्धी ही मिळते. किंवा त्या समूहाचा वापर करत करत काही विशिष्ट एक-दोन लोकांना ती संधी आणि प्रसिद्धी मिळत जाते.
असे घडण्याचे एक कारण अकार्यक्षम लोकांमध्ये झालेले विकेंद्रीकरण.
आणि दुसरे कार्यक्षम समूह असून देखील केंद्रीकरणाद्वारे ठराविक हाती सत्ता ठेवण्याचा अट्टाहास.
बऱ्याचदा सामाजिक कार्य हे पूर्वापार चालत आलेली शोषण व्यवस्था या विरुद्ध आवाज उठवण्याचे एक प्रतिक म्हणून ही केले जाते. पण त्या प्रक्रियेत पद, पैसे, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आल्यानंतर तेच कार्यकर्ते ‘शोषित’ चे कधी ‘शोषक’ होऊन जातात हे ना त्यांना कळते ना त्यांच्या समूहाला.
भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात समाजकार्य क्षेत्रातील सुसंवादाची, सहिष्णुतेची, त्या सोबतच सततच्या आत्मपरीक्षणाची नितांत गरज आहे. जर हे क्षेत्र देखील इतर क्षेत्रांप्रमाणे व्यवहारी झाले तर सामाजिक बदल हे फक्त देखाव्या पुरते उरतील.
असं म्हणतात, ‘हे जग काहीच न करणाऱ्यांमुळे खराब होतंय’ पण खरं हे आहे कि, ‘हे जग दिशाभूल करणाऱ्यांमुळे जास्त खराब होतंय’.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, पण जी समोर असते तीच दिसते.
– रोचना वैद्य