भर रस्त्यात मध्यभागी झोपण्याची सवय या महिलेच्या पाय मोडण्याला जबाबदार होती . मनोयात्रींना उपाशी चालत राहिल्यामुळं प्रचंड थकवा आणि थकव्याने ग्लानी येते. डोक्यातल्या जखमा , त्यावर घोंगावणाऱ्या माश्या आणि पायाचं हाड मोडलेल्या अवस्थेत राहावं लागणाऱ्या मनोयात्री महिलेच्या वेदना शब्दांपलिकडच्या होत्या . पण अशा महिलेला खडतर सायास करून जेव्हा रुग्णालयात दाखल केलं जातं आणि दोन दिवसांनी चौकशी केल्यावर ती महिला वॉर्डातून ‘ गायब ‘ गेल्याचं सांगितलं जातं तेव्हा जे क्लेश झाले ते सांगण्यासारखे नाहीत !
विविध सामाजिक कामांत सर्जनशील वेळ आणि ऊर्जा देणारा मित्र अमोल देसाई याने एका जखमी महिलेचा व्हिडीओ मला पाठवून दिला होता . हा व्हिडीओ पाहिल्यावर मी तात्काळ त्याला फोन केला आणि महिला कुठं आहे हे विचारलं . त्यानं बेळगावजवळ असलेल्या निंगेनहट्टी गावाचं नाव सांगितलं . महापुराच्या काळात आठ दिवस वैद्यकीय आणि इतर मदत करत या रस्त्यांवरून आम्ही फिरलेलो होतो . खूप लांब आणि कच्च्या रस्त्यावरून प्रवास करून दोन अडीच तासांनी जेव्हा आम्ही त्या गावाच्या बाहेर भर रस्त्यात त्या महिलेला झोपलेलं बघितलं तेव्हा काळजाचा ठोका चुकला . कारण या रस्त्यावर वाळूची वाहतूक करणारे कित्येक ट्रक ये जा करत होते . अमोल आणि त्याच्या मित्रमंडळींना ही जर दिसली नसती तर कुठल्यातरी गाडीखाली चिरडून मेली असती …
मी आपल्या रुग्णवाहिकेतली कात्री काढली आणि हातमोजे घालून तिच्या दुर्गंधी सुटलेल्या केसांना हात लावला तशी वेदनेनं ती कन्हली . डोक्यात जखमा झाल्या असणार हे मी ओळखून होतोच . कित्येक वर्षांत आंघोळ नसल्यानं धूळघाणीनं चिकटलेले केस , त्या केसांत हजारोंच्या संख्येनं असणाऱ्या ऊवा … मास्क लावूनही मला एक उग्र वास मेंदूला झिणझिण्या आणत होता !
अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक संपूर्ण केस कापून घेतले . केस कापत असताना आजूबाजूने ये जा करणाऱ्या अनेक लोकांनी गाडी थांबवून नेमकं काय चाललंय , याबद्दलचं कुतूहल पोसलं ! काही लोकांनी या महिलेशी कन्नड भाषेत संवाद करत तिला शांत बसवलं . काही लोकांनी आसपासच्या गावांमध्ये फोन लावत तिच्या कुटुंबाची खबर मिळते का , हे पाहिलं . एवढ्या काळात तिला स्वच्छ करून आम्ही जखमांवर बँडेज बांधलं आणि तिला उबदार कपडे घातले . अमोलच्या मित्रमंडळींनी तब्बल 8 किमी दूर जाऊन तिच्यासाठी खायला आणि पायात चपला आणल्या . परंतु ही महिला आपलं गाव ‘ हट्टी ‘ शब्दासदृश सांगत असल्यामुळं आणखी काही चौकशी करण्याचा अमोल आणि त्याच्या मित्रमंडळींनी प्रयत्न केला . त्यात यश आलं नाही …तिच्या पायाचं हाड घोट्याजवळ मोडलेलं होतं . पायावरून दुचाकी गेली असण्याची शक्यता होती . कारण ही महिला सरळ रस्त्यातच झोपत असायची .
आता या मोडलेल्या हाडावर उपचार होण्यासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा निर्णय घेऊन याकामी मा . जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेण्याचे ठरले . अमोलनं त्यांच्याशी संवाद करून 108 रुग्णवाहिका बोलावली आणि त्यातून तिला CPR ( जिल्हा रुग्णालय ) मध्ये पाठवण्यात आलं . आता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फोन केले आहेत म्हटल्यावर या महिलेवर उपचार होऊन तिचं योग्य ठिकाणी पुनर्वसन होईल असं आम्हाला वाटलेलं होतं . परंतु , अमोलनं जेव्हा दोन दिवसांनी चौकशी केली तेव्हा ही महिला वार्डातुन पळून गेल्याचं सांगण्यात आलं .
CPR मध्ये आपण दाखल केलेले बेवारस रुग्ण एकतर पळून गेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाल्याचा निरोप , चौकशीअंती , मिळण्याचा आपला गेल्या 10 वर्षांतला अनुभव आहे . आपल्या देशातल्या उदासीन आणि संवेदनाहीन आरोग्यव्यवस्थेचा चेहरा म्हणजे आपली सरकारी रुग्णालये आहेत . ( अपवाद असतील ! ) या रुग्णालयांमध्ये नोकरी करणारे लोक तुम्हाला भेटतील ; पण सेवा करणारे भेटणार नाहीत ( अपवाद आहेत ! ) ! ‘ नोकऱ्या ‘ मिळवून स्वतःची आयुष्ये नीट करणाऱ्या लोकांना गरिबांच्या आयुष्याचं फार काही पडलेलं असत नाही , हेच चित्र बहुतेकदा बघायला मिळतं .
दाखल केलेल्या महिलेवर तात्काळ उपचार केले असते तर बिचारीला मोडका पाय घेऊन आजही रस्त्याच्या मध्यभागी झोपण्याची वेळ आली नसती . कोरोनामुळं खाजगी प्रकल्पांना मर्यादा असल्या तरी सरकारी मनोरुग्णालयात दाखल करता आलं असतं … पण या महिलेकडं ‘ लक्ष ‘ द्यायला वेळ कुणाकडेही नव्हता . सबंध जिल्हा रुग्णालय , सबंध समाजव्यवस्था इतकी व्यस्त होती की , एक वेदनेनं तडफडणारा जीव या लोकांकडून सांभाळता आला नाही !
इतके दिवस आरोग्य यंत्रणेवर लिहिताना वाटायचं की , कशाला आपण या जखमा उकरायच्या , जसं चाललंय तसं चालू द्यावं , काही लोकांना तरी सेवा मिळतच असते की , तीही आपल्यामुळं बंद व्हायला नको …! पण खरं सांगू का – आपल्या अशा विचार करण्यामुळं आरोग्य यंत्रणा अजगर झाली आहे ! आता या सरकारी रुग्णालयांचं हे ‘ असं ‘ असणं लोकांनी स्वीकारलेलं आहे , पत्रकारांना काहीही पडलेलं नाही , नेते मंडळींनी पाठवलेल्या लोकांची सोय फोन केल्यावर होते त्यामुळं तेही यात सुधारणा घडवून आणण्यासाठी काहीही करत नाहीत . एकूण काय आहे तर , पैसे असतील तर जीव वाचवण्यासाठी लढाई लढता येईल अन्यथा उपचार , अन्न , पाणी यांच्या अभावात जीव सोडावा लागेल , हे महासत्ता ( सरकारी बातमीदार यंत्रणांनी उभी केलेली प्रतिमा ! ) होऊ घातलेल्या भारतातलं भयानक वास्तव आहे !
महिला वार्डातुन गायब झालेल्या या महिला मनोयात्रीविषयी जिल्हा रुग्णालयाला विचारणारं कुणीही नाही … स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून दाखल केलेल्या रुग्णाची अशी हेळसांड होत असेल तर सामान्यांना उपचार मिळवण्यासाठी काय दिव्य करावी लागत असतील याचा विचार करा . ‘ काहीच नसण्यापेक्षा काहीतरी सुरू आहे ना ‘ – या मानसिकतेवर समाधानी राहणारे लोक व्यवस्था नादुरुस्त , रोगट करतात …मोडलेला पाय घेऊन कुठल्याशा अनोळखी रस्त्यावर उपाशी तापाशी ही महिला फिरत असेल कुणास ठाऊक … ती आता मेली तरी कुणालाही फरक पडणार नाही …
– अमित प्रभा वसंत