पुणे : पुणे महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या लाईटहाऊस प्रकल्पाच्या यशस्वी १० वर्षांच्या प्रवासाचा दशकपूर्ती सोहळा २७ जुलै २०२६ रोजी गणेश कला क्रीडा सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच ७०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
गेल्या दशकात लाईटहाऊस प्रकल्पाने पुण्यातील ५०,००० हून अधिक युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले असून, त्यापैकी २५,००० हून अधिक युवक-युवतींना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. युवकांच्या सक्षमीकरणासाठी आणि रोजगारक्षम कौशल्य विकसित करण्यासाठी हा प्रकल्प प्रभावी व्यासपीठ ठरला आहे.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे मा. उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, मा. माजी खासदार श्रीमती वंदना चव्हाण, मा. अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर, मा. अतिरिक्त आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. उपआयुक्त श्रीमती आशा राऊत, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) चे संचालक श्री. अजय खेडेकर, तसेच लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे चेअरमन श्री. गणेश नटराजन आणि सह-संस्थापक सौ. रुची माथूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दशकभर युवकांच्या कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शासकीय विभाग, सामाजिक संस्था, उद्योग क्षेत्रातील भागीदार आणि विविध सहकार्य करणाऱ्या संस्थांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत, आगामी काळातही अधिकाधिक युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
पुणे महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या भागीदारीत सुरू झालेला लाईटहाऊस प्रकल्प आज युवकांच्या कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी एक यशस्वी मॉडेल म्हणून ओळखला जात आहे. गेल्या दहा वर्षांतील उल्लेखनीय कामगिरीमुळे हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी नमुना ठरला असून, भविष्यातही अधिकाधिक युवकांना सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.






