आपल्याला मिळालेलं आयुष्य आणि सत्ता , संपत्ती , शारीरिक , बौद्धिक इत्यादी ताकतींचा वापर आपण कसा करतो , यावर ‘ माणूस ‘ म्हणून आपली वास्तविक उंची ठरत असते ! ताकतींच्या जोरावर जबरदस्तीनं उंची निर्माण करण्याचा प्रयत्न पोकळ असतो , तात्कालिक असतो . खोटा अभिमान , पैसा , दंभ यांद्वारे उभी राहिलेली प्रतिमा लवकर रसातळाला जाते . याउलट आपल्याजवळ जे आहे ते असणं , ही आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांची , परिस्थितीची देन आहे , हे कळलेल्या लोकांचे पाय जमिनीवर असतात ! आणि हो , विवेकी भूमिका घेण्याचा विषय ज्याच्या त्याच्या जडणघडणीवर अवलंबून असतो !
आजवरच्या प्रवासात भेटलेल्या कित्येक लोकांना आपण रुजण्यासाठी पाणी घातलेलं आहे . या पाण्यावर वाढलेली झाडं अमरावतीपासून सोलापूर आणि नाशिक पासून पुणे , मुंबई , कोल्हापूर , कर्नाटकपर्यंत वाढलेली आहेत . ही झाडं कुणाला तरी सावली देत आहेत किंबहुना त्यांनी ती देत रहावं , यापेक्षा अजून काय हवं आहे आपल्याला ! पाणी घालणाऱ्या माणसाबद्दल त्यांनी स्मृत्या ठेवाव्यात असं काही बांधील गणित नाही ! असो !!
कोल्हापुरातून मला आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त करणारा फोन 7 – 8 वर्षांपूर्वी आला होता . मी नेहमीप्रमाणे आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तीला त्याची नोकरी , व्यवसाय , कौटुंबिक स्थिती वगैरे विचारली . सगळं समाधानकारक आढळल्यावर काही दिवसांनी आर्थिक मदतही स्वीकारली . यानंतर रस्त्यात दिसणारे मनोयात्री , जखमी पशु – पक्षी यांबद्दल ‘ काय भूमिका घेऊ ? ‘ , अशी विचारणा करणारे फोन या व्यक्तीकडून येऊ लागले . कोल्हापुरातल्या आपल्या कुठल्याही सामाजिक सेवेचा विषय आल्यावर निखिल कोळी या मित्राशिवाय मार्गी लागणार नाही या साखळीत आता आणखी एक कडी जोडली गेली . – गौरीश सोनार !
आज गौरीशबद्दल लिहिण्याचं काही विशेष कारण नाही ; पण सत्ता संपत्तीचा भरमसाठ ‘ साठा ‘ असणारे ,घरातल्या अन्नाला अनेकदा कचराकुंडी दाखवणारे , निव्वळ स्वतःभोवतीच भौतिक सुखाचं रिंगण करून भ्रमात असणारे आणि याउलट मोजक्या सत्ता संपत्तीचा सदुपयोग करत वास्तविक आनंदात असणाऱ्या माणसांबद्दल लोकांना कळलं पाहिजे .
एकदा एक बेघर माणूस गौरीशला दिसला . तो रस्त्याकडेला रहात होता . गौरीशनं मला फोन करून त्याची माहिती दिली . तो मनोयात्री नव्हता ; परंतु त्याला जवळचं कुणी नसल्यामुळं तो या परिस्थितीत रहात होता . गौरीशनं त्याला ताडपत्री विकत आणून पावसाचा निवारा होईल अशी स्थिती केली . एका बेघर माणसाला या निवाऱ्याचं सुख चार भिंतीत सुरक्षित असणाऱ्या लोकांना कळणार नाही ! सुतारकाम करणाऱ्या या माणसानं त्या झोपडीत जुजबी सामानानिशी काम करायला सुरुवात केली . या काळात निखिलनं त्याला एक वेळ डबा लावून त्याचे पैसे भागवण्यास सुरुवात केली . एका डब्यात दोन वेळा जेवत हा माणूस आजही स्वाभिमानानं काम करत आहे …
कोविड पॅण्डेमिक सुरू झाल्यानंतर गौरीश सतत फोन करून ‘ पैसे लागले तर कळवा ‘ , असं विचारत राहायचा . परंतु आपल्याकडं पुरेसे पैसे असल्यामुळं आपण त्याची मदत घेतली नाही .
शिवाजी पेठ , कोल्हापूर इथं महापुराच्या काळात आपण मदत करताना अभिजित बरगे यांनी अंध कुटुंबांबद्दल सांगितलेलं होतं . आपण तेव्हा या कुटुंबांना पुरेशी मदत पोहोचवली होती . कोरोनाच्या साथीत या कुटुंबांपर्यंत आपल्याला पोहोचता आलेलं नव्हतं . गौरीशनं या कुटुंबांपर्यंत पोहचत त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या .
सांगरुळ गावात ई – बिर्याणी नावाचं दुकान असणाऱ्या अक्षय भास्कर या मित्रानं कडक लॉकडाऊन असतानाही एका मनोयात्रीला सहा – सात महिने घास भरवण्याचं काम केलेलं आहे .
बेलापूर ( मुंबई ) इथं लक्ष्मी शामल सुभाष या मैत्रिणीनं यापूर्वी एका मनोयात्री महिलेला उपचार मिळवून देण्यात मदत केल्यामुळं घर सापडल्याबद्दल मी पूर्वीच लिहिलं आहे . यावेळी त्वचेच्या रोगामुळं घराबाहेर सोडलेल्या मांजरीला तिनं औषधोपचार आणि निवारा दिला . आणि रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडलेली जांभळ्या पाणकोंबडीला जीवदान देण्याचं काम केलेलं आहे .
आजऱ्यात उदरनिर्वाहासाठी चिकन सेंटर चालणाऱ्या वाहिदचा महिन्या दोन महिन्यातून कुत्र्यांना वाचवल्याचा फोन येतो …
डॉ . माहेश्वरी बारड ताईंनी कुत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मनोयात्री आणि बेघर कुटुंबाला आधार दिलेला आहे .
तुफेल आगा नावाच्या मित्रानं मनोयात्रीला खायला प्यायला घातलं आणि मला फोटो पाठवले .
असे कित्येक लोक माणूस , प्राणी , पक्षी , झाडं आणि संबंध पर्यावरणाला स्वतःइतकंच प्रेम करतात . त्यांच्याबद्दल कधी फोटो स्वरूपात लोकांसमोर येतं आणि बहुतेकांना फोटो काढायला वेळ मिळत नाही – या सगळ्यांनाच सलाम !
कित्येक लोकांचे फोन येतात आणि मनोयात्री किंवा जखमी पशु – पक्षांना कशी मदत करू किंवा मदत केल्याबद्दल कळवणारे फोन येतात तेव्हा आपण लिहिलेलं किंवा एखाद्या व्याख्यानात बोललेलं सार्थकी लागल्याचं समाधान होतं .
एका बाजूला भूमिका घेतल्याचं समाधान आणि दुसऱ्या बाजूला भूमिका घेणाऱ्या ‘ माणसांची ‘ साखळी तयार होत असल्याचं समाधान … अशा दुहेरी समाधानाच्या आनंदाला सीमा नाही !
गौरीशला त्याच्या विवाहाच्या प्रसंगी आपण गुलमोहर दिलेला होता … त्याची वाढ आनंददायी आहे … तो बहरतोय …!
– अमित प्रभा वसंत, कोल्हापूर