लेखिका: प्रभा विलास – संस्थापिका – वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे
ऑगस्ट 2024 मधे बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचारी रेप केस मुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सामाजिक संस्था आपल्या पध्दतीने समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांच्या मर्यादा आहेत अशा स्थितीमध्ये प्रशासनाने शाळांमधील मुलीना त्यांच्या सुरक्षिततेविषयी जागरुती करण्याची, वाढत्या वयात त्यांच्या शरीरात आणि मनात होणाऱ्या बदला विषयी जागरूक करण्याची जबाबदारी काही सामाजिक संस्थांना सोबत घेऊन करण्याचा निर्णय घेतला.
यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 26 शाळांमधील 1396 किशोरी सोबत वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे आम्हाला सक्रिय सहभाग घेऊन योगदान देता आले यासाठी महिला व बाल कल्याण, जिल्हा परिषद पुणेविभागाचे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण विभाग श्री जे. बी. गिरासे साहेब, पोतदार मॅडम यांचेतसेच मावळ विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री वाळूंज सर यांचे आभारी आहोत.
प्रशिक्षणामध्ये आरोग्य – जेंडर, कायदा आणि लैंगिक शोषण आणि रोखथाम यावर किशोरींना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणा मागील उद्देश किशोरी मध्ये वरील विषयांबाबत जागृती निर्माण करणे आणि त्यांना मुक्तपणे त्यांचे विचार, भावना आणि अडचणी मांडण्यासाठी खुले व्यासपीठ मिळावे आणि सोबतच एकमेकांच्या अनुभवातून त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करणे हा होता.
मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुली बऱ्याचदा बोलू शकत नाही कारण त्यामागे अनेक सामाजिक बंधने आहेत, त्या स्वतःला सुध्दा कमजोर समजतात. प्रशिक्षणा दरम्यान मुलीं सोबत खूप खोलवर चर्चा केली गेली की मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी त्यांनी करावयाच्या भूमिकेची जी समाजाच्या माध्यमातून चौकट तयार केली आहे त्याचा बळी फक्त स्त्रीच नाही तर पुरुष सुद्धा आहे. आणि म्हणूनच पुरुष आपला शत्रू नसून पुरुषप्रधान मानसिकता असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार बदलविण्याचा आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. त्यासाठी अनेक छोटे कृती कार्यक्रम ठरविले गेले ज्यामुळे समाजातून लिंगभेद कमी होण्यासाठी आपला हातभार लागेल जसेकी मुलीला मैदानी खेळ, लढण्याची प्रेरणा देणाऱ्या वस्तु भेट देणे तर मुलाला त्याच्यातील प्रेम, माया जागी राहावी, घरातील कामाची जबाबदारी दोघांची असते आणि घरकाम कमी दर्जाचे नाहे ही भावना त्याच्यामध्ये विकसीत व्हावी म्हणून बाहुली आणि भांडीकुंडी देखील भेट देणे, सोबतच समाजामध्ये स्त्रियांना न्याय मिळावा आणि त्यांच्यावर अत्याचार होऊ नये यासाठी कोण कोणते कायदे अस्तित्वात आहेत, त्याचा वापर करण्याची प्रक्रिया काय असते, कोणाला मदत मागता येते या सर्व गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सोबतच कायद्याचा गैरवापर केल्यास त्याची धार बोथट होते आणि अनेक गरुजू महिला, मुलीना न्याय मागताना खूप अडचणी येऊ शकतात म्हणून कायद्याचा गैर वापर करण्याचे टाळले पाहिजे आणि योग्य प्रसंगी कायदा वापरला पाहिजे याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये प्रजनन आरोग्य, आहार या विषयांवर देखील मार्गदर्शन करण्यात आले. त्यात शरीर साक्षरता, स्वच्छता, समज गैरसमज यावर चर्चा करण्यात आली. या विषयासाठी 1396 मधून प्रातिनिधिक स्वरूपात 609 किशोरी ची प्रशिक्षण पूर्व आणि प्रशिक्षण पश्चात क्षमता चाचणी करण्यात आली ज्यातून प्रशिक्षणामुळे माहिती, वर्तणूक, विचार यात बदल होण्यास काही मदत झाली का हे तपासले गेले.
त्यानुसार असे दिसले की मासिक पाळी म्हणजे काय या प्रश्नाला 609 मुलींपैकी 175 मुलीना मासिक पाळी म्हणजे काय हे माहीत नव्हते तर 213 मुलीनी शरीरातून खराब रक्त बाहेर पडते असे सांगितले. प्रशिक्षण नंतर मात्र ही नैसर्गिक प्रक्रिया आहे असे म्हणणाऱ्या मुलीची संख्या 484 होती. पाळी विषयी समाजाचा गैर समजुतीचा पगडा इतका जास्त आहे की ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे चटकण मान्य करणे काही मुलीना कठीण जात होते. दुसऱ्या प्रश्नात म्हणजे पाळीचे रक्त आणि मूत्र एकाच भागातून येते या प्रश्नाला धरून प्रशिक्षणा आधी443 मुलींच्या मनात गैरसमज होता प्रशिक्षण नंतर मात्र या सर्व मुलींचा गैरसमज दूर झाला. मुलांना आणि पुरुषांना मासिक पाळीची माहिती दिली पाहिजे का या प्रश्नावर प्रशिक्षणा मुळे 436 मुलींच्या विचारांमध्ये आम्ही बदल घडवून आणू शकलो आणि पाळी म्हणजे केवळ बायकांचा प्रश्न आहे त्याचा पुरुषाशी काहीही संबंध नाही हा विचार खोडून काढण्याची प्रक्रिया सुरू करता आली.
आहाराच्या बाबतीत तिरंगा आहाराची संकल्पना 609 मुलीं पैकी 411 मुलीना माहीत नव्हती मात्र प्रशिक्षणामुळे 510 मुलीना ही संकल्पना नीट समजली. आहारात नियमीत लोह मिळण्यासाठी लोखंडी भाड्यांचा स्वयंपाकासाठी वापर केला पाहिजे याविषयी 471 मुलींमध्ये जागरुती वाढली. कुटुंबातील स्त्रियांनी सर्वान सोबत जेवायला बसणे योग्य की अयोग्य या प्रश्नावर प्रशिक्षणा नंतर जरी आम्ही 509 मुलींचे मत परिवर्तन करू शकलो तरी समाजाच्या दडपणा खातर अजून 100 मुलीना मात्र एकत्र जेवले पाहिजे हे म्हणण्याचे धाडस झाले नाही.
प्रशिक्षणा दरम्यान अनेक मुलीनी मन मोकळे केले ज्यातूनकाही निराशा आणणारे तर काही प्रेरणा देणारे अनुभव पुढे आले. त्यातील काही प्रतिक्रिया.
“आमच्या शाळेजवळ आमच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे, म्हणून मला घरातून पाच दिवस शाळेत पाठवले जात नाही. माझा अभ्यास बुडतो मला खूप वाईट वाटते”
या अनुभवांमुळे शाळेजवळ मंदिर असणे हे मुलींच्या शिक्षणाच्या किती आड येत असेल हा विचार पहिल्यांदाच मनात आला.
“मला वडील नाहीत, त्यामुळे माझ्याबाबत कायमच असे बोलले जाते की हिला धाक नाही त्यामुळे ही बिघडू शकते. समाज असा का विचार करतो की मुलीना धाक असणे गरजेचे आहे. धाक नसेल तर त्या नीट राहू शकत नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटते. कदाचीत याच मानसिकतेमुळे मुलींवर हिंसा होत असेल ”
“माझी आत्या शिक्षण घेत होती तर तिला खूप लोक त्रास देत होते. तीने लोकांच्या बोलण्याला न जुमानता खूप कष्टाने शिक्षण पूर्ण केले. आज ती वकील आहे, आणि सगळे तिचा आदर करतात”
“आमचे पालक आमच्यावर खूप बंधने घालतात, आम्ही नीट वागतो तरीही. त्यांना कोणीतरी तुमच्यासारख्या व्यक्तीने येऊननीट समजावून सांगितले पाहिजे म्हणजे आमचे पालक देखील आमच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि आमचाहा प्रवास थोडा सोपा होईल”
जवळपास 1300 मुलीं बरोबरचा हा संवाद आम्हाला सुद्धा खूप संपन्न करणारा आणि बरेच काही शिकविणारा होता.
हा प्रवास इथेच थांबता कामा नये, केवळ मुलीना मार्गदर्शन करून आपण उद्देशापर्यंत पोहचू शकत नाही तर त्यासाठी काही ठोस उपययोजना करणे गरजेचे वाटते.
मुलीं सोबतच मुलांना प्रशिक्षित करणे खूप गरजेचे आहे. सोबतच पालकांना सकारात्मक पालकत्व, आपल्या पाल्या सोबत संवाद साधण्याचे आणि मैत्री करण्याचे कौशल्य, शाळांमध्ये तज्ञ समुपदेशकाची गरज, शाळा समितीचे सक्रिय असणे, शाळेमध्ये संवादपेटी असणे व त्याची व्यवस्था बघणारी यंत्रणा कार्यरत असणे, मुलांना शाळेत ने आण करणाऱ्या यंत्रानेसाठीचे कडक नियम आणि त्याची अंमलबजावणी, मुलां सोबत काम करणाऱ्या व्यक्तींना, शिक्षकांना मुलांच्याअधिकरांविषयी वारंवार प्रशिक्षण देणे, अशा अनेक अंगाने काम केल्यास आणि प्रशासनाने यात सामाजिक संस्थाना जोडून घेऊन काम केल्यास ते अधिक उद्देशपूर्तिकडे नेणारे असेल यात शंका नाही.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 26 शाळांचे मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका आणि शिक्षकवर्ग यांचे अनमोल सहकार्य लाभले त्यांचेही आभार.
हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडणाऱ्या सर्व वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्थेच्या टीम चे अभिनंदन.











