पुणे : येरवडा येथील सेमी उर्दू शाळेत आयोजित शैक्षणिक मदत कार्यक्रमात ६० विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शैक्षणिक मदत करण्यात आली. ‘इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन’च्या या उपक्रमात महिला शिक्षिकांनी फाउंडेशनच्या विविध कार्यांची माहिती दिली, तर रफिक भाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
कार्यक्रमात शाळांतील आवश्यक सुविधांबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांसाठी चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले. मुलींच्या शिक्षणात प्रगती झाल्याचे दिसत असले तरी मुलांमध्ये शिक्षणाविषयी अनास्था आढळत आहे, याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
पैगंबर शेख यांनी मुलींच्या उच्च शिक्षणानंतरच्या स्थितीवरही प्रकाश टाकला. त्यांनी मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे महत्त्व सांगितले आणि त्यांच्या भविष्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
गेली ११ वर्षे चालत असलेल्या ‘आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी’ उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना मदत मिळाली आहे. या उपक्रमात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात आणि मुस्लिमेतर बांधवांनी देखील या मदतीत सहभाग घेतल्याचे शेख यांनी नमूद केले. मदत करून उपकार केले जात नाहीत, त्यामुळे धन्यवाद देण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले.
शेवटी, शेख यांनी सांगितलेल्या गोष्टींवर अंमलबजावणी करण्याची अल्लाह सर्वांना सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता झाली.
– पैगंबर शेख
इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन
मुस्लिम समाज सुधारणा चळवळ