लोणावळा : इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) कलारंग हा परिवर्तनाला चालना देणारा कला आणि हस्तकला महोत्सव, 26 आणि 27 जानेवारी रोजी यशस्वीपणे संपन्न झाला. सदर महोत्सवाने लोणावळामधील कलाप्रेमी आणि अभ्यागतांवर कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे. या प्रदर्शनात लोणावळ्यातील 30 हून अधिक शाळांमधील मुलांचे कलात्मक आविष्कार, पुणे आणि लोणावळा येथील विविध बाल संगोपन संस्थांमधील 400 हून अधिक मुले आणि पुण्यातील वीटभट्टीवर कामकरणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या 100 हून अधिक मुलांचे कलात्मक कौशल्य दाखवण्यात आले. याव्यतिरिक्त, कार्यक्रमात पुण्यातील गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिलांनी बनवलेल्या घरगुती सजावटीच्या वस्तू आणि पोशाखांचे प्रदर्शन आणि खरेदी देखील लोणावळावासीयांना करता आली.
महोत्सवाला लोणावळा शहर तसेच पुणे – मुंबईहुन आलेल्या पाहुण्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, मुंबईचे डीनप्रा. विश्वनाथ साबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून या महोत्सवाला लाभले. प्रा. साबळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले आणि आयएससी आणि सर जेजे स्कूलऑफ आर्ट यांच्यातील भविष्यातील सहकार्याची आणि भागीदारीची हमीदेखील दिली. दीपक घैसास (प्रख्यात आयटी प्रोफेशनल, डॉ. शशिकांतवैद्य (मुंबईतील एक प्रमुख बालरोगतज्ञ), आणि सत्य साई कार्तिक, ASP IPS लोणावळा यांच्यासह इतर मान्यवर पाहुण्यांनी देखील ISC च्यामुलांसाठी आणि महिलांसाठीच्या कलारंग तसेच इतर कार्यक्रमांचे कौतुक केले.
कलारंग कार्यक्रमाने पुणे, मुंबई आणि लोणावळा येथील अभ्यागतांना फक्त आकर्षितच केले नाही, तर त्यांना कलाकारांशी संवाद साधून त्यांच्यासर्जनशील विचार आणि स्वप्नांबद्दल जाणून देखील घेता आले. कलारंगचित्रकारिता स्पर्धेच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ श्रेणीच्या पुरस्कार वितरणाने उत्साहात भर पडली. सर्व विजेत्यांना प्रा. विश्वनाथ साबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुण्यातील तरुण कलाकारांनी सादर केलेल्या संगीत संध्येने पहिल्या दिवशी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लोणावळा आणि पुणे येथील विविध स्वयंसेवीसंस्था आणि बाल संगोपन संस्थाच्या उत्साही सहभागाने कार्यक्रमाचे यश अधिक ठळक झाले.
कलारंग सारखे कार्यक्रम दुर्बल घटक तसेच मुलांचा आणि महिलांचाआवाज जनमाणसात पोहोचवणारा आणि सहानुभूती नव्हे तर समानता आणि न्याय मिळवून देणारा ठरू शकतो. या कार्यक्रमाच्या रूपाने बऱ्याचदा दुर्लक्षित केलेल्या कलागुणांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमाचा समारोप करताना, इंडिया स्पॉन्सरशिप कमिटीच्या कार्यकारी संचालिका मेधा ओका यांनी प्रत्येक व्यक्तीला, वय, लिंग, संगोपनपद्धतीआणि परिस्थितीची पर्वा न करता त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि समाजासोबत त्यांच्या अद्वितीय कला आणि हस्तकला सादर करून समाजात महत्वाचे योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल असा समाज निर्माण करण्याचे आवाहन केले.