ठाणे : मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी परिवर्तन व वोपा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘मायका’ या मराठीतील पहिल्या अॅपचे भव्य लोकार्पण ठाण्यात संपन्न झाले. ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध आरजे संग्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैरामजी जीजीभाय हायस्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला.
‘मायका’ अॅपच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी सखोल माहिती मराठीत उपलब्ध करण्यात आली आहे. विशेषतः ‘शिक्षकांचे मानसिक आरोग्य’ या कोर्सद्वारे शिक्षकांना ताण-तणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन राखण्याची कौशल्ये आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन मिळणार आहे. या अॅपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉटसह विविध तज्ञांशी संवाद साधण्याची सुविधाही आहे.
आरजे संग्राम यांनी तणावाचा उत्क्रांतीशी असलेला संबंध विशद करत, शारीरिक व्याधींप्रमाणे मानसिक आरोग्यावर बोलण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी ‘मायका’ अॅपमुळे मानसिक आरोग्याची जागरूकता दूरवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. हमीद दाभोळकर यांनी अॅपच्या निर्मितीमागील उद्देश सांगताना, मानसिक आरोग्य समस्या योग्य उपचारांद्वारे बऱ्या होऊ शकतात, असे स्पष्ट केले. त्यांनी शिक्षकांना व पालकांना ‘भावनिक प्रथमोपचार’ या कोर्सद्वारे प्रशिक्षित करण्याचे महत्त्वही सांगितले.
वोपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रातील सकारात्मकता व स्वीकारात्मकतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी ‘मायका’ अॅपच्या माध्यमातून शिक्षकांना काम व वैयक्तिक आयुष्यातील संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तंत्रांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल, असे सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी राक्षे सर, आरोग्य अधिकारी पगारे सर, चव्हाण सर यांसह नोसील लि. (NOCIL Ltd) आणि मोरडे फूडस या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. स्वप्नील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन झुंजार राव यांनी मानले.
‘मायका’ अॅपच्या माध्यमातून मानसिक आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प परिवर्तन व वोपा संस्थांनी केला आहे. शिक्षकांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देत, हा उपक्रम त्यांच्या व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे.