सांगली : आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये केवळ माहितीचा साठा वाढवणे पुरेसे नाही, तर त्यांच्यात चिकित्सक विचार, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली शाखेच्या वतीने ‘मुलांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करायचा?’ या एमकेसीएलचे मार्गदर्शक विवेक सावंत लिखित पुस्तिकेच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंनिस कार्यकर्त्यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
राहुल थोरात म्हणाले की, विवेक सावंत यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेत मुलांच्या नैसर्गिक उत्सुकतेला योग्य दिशा देत त्यांना प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधण्यासाठी कसे प्रोत्साहित करावे, तसेच अंधश्रद्धा व गैरसमजांपासून दूर ठेवून त्यांच्यात विवेकवादी विचार कसा विकसित करावा, याचे सोप्या आणि व्यावहारिक भाषेत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
प्रा. अमित ठकार म्हणाले की, बालवयात मुलांची निरीक्षण क्षमता आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढवणे आवश्यक आहे. मुलांच्या ‘का?’ आणि ‘कसे?’ या प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन त्यांच्यात तार्किक विचार करण्याची सवय निर्माण करणे हे पालक आणि समाजासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
डॉ. संजय निटवे म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सामाजिक प्रबोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी सातत्याने कार्यरत आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून घराघरांत विवेकाचा विचार पोहोचण्यास मदत होईल.
कार्यक्रमाला सांगली अंनिसचे कार्यकर्ते डॉ. सविता अक्कोळे, गीता ठाकर, त्रिशला शहा, आशा धनाले, धनश्री साळुंखे, शोभा मधाळे, जगदीश काबरे आणि अभिषेक कांबळे उपस्थित होते.
