ब्लॅंकेटच्या कपड्यांने चोळी करून तिनं अलगदपणे छाती झाकून ठेवली होती, अन् कमरेच्या खालच्या भागाला पोत्यानं गुंडाळून घेतलेलं होतं. हातात एक गाठोड घेऊन ती बस स्थानकावर हताश होऊन भटकत उदरनिर्वाह करीत. येणाऱ्या जाणाऱ्या हजारो प्रवाशांच्या गर्दीतून ती लोकांच्या नजरेत चटकन येई…!
बस स्थानकावरच्या प्लॅटफॉर्मवर बसलेल्या लोकांत ती मिसळून जाई तर, कधी बार्शीच्या रस्त्यावर वणवण भटकत जाई. लोकांचा लळा जिव्हाळा लागलेला होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या राहिलेल्या कचऱ्यातून पाण्याच्या बाटल्या अन् मिळेल ते अन्न खावून पोटाचा उदरनिर्वाह चालवत. बार्शीच्या रस्त्यावरच्या हॉटेलात, व्यापाऱ्या लोकात हिच्या विषयी सहानुभूती खाणं अन् बॉटली भर पाणी तीला देत. याच व्यापारातील सलीम भाईंन आस्थेने तिच्या पुनर्वसनासाठी मला पुढं केलं.
तिच्या जवळ गेल्यास अन् तिच्या कामात व्यत्यय आणल्यास ती घाण घाण शिव्या देऊन वेळप्रसंगी मारण्यासाठी दगड घेऊन धावत सुटायची, बेभान होऊन…! तशी ती शांतच…एकदा तिला भेटण्यासाठी पाहण्यासाठी बार्शीला जाण्याचं ठरलं अन् तसं नियोजन आखलं,
आजपर्यंत तिच्या बद्दल बऱ्याच लोकांनी मित्रमंडळीनी माहिती दिलेली पण तिच्या समोर थांबून फोटो घेण्याचं धाडस कुणालाच करता आलं नाही.
म्हणून मला तीची प्रत्यक्ष भेट होणं गरजेचं होतं ! शेवटी सोलापूरहून एस.टीने बार्शी गाठली, अन् एस.टी. बस स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच माझी नजर तिच्या शोधात सैरभैर होऊ लागली. एस.टी तून जसा मी खाली उतरून तिच्या शोधात जाणार इतक्यात…! ती सुलभ शौचालयच्या समोरच्या गर्दीतून वाट काढत माझ्याकडेच येत आहे. असं वाटू लागलं. एखाद्या अश्मयुगातल्या काळाच्या पेहरावात ती समोर उभी ठाकली. हा पेहराव तिनं स्वतःच केलेला असावा.
ती व्याकूळ हताश अन् अन्नाच्या शोधात मला दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर भुक होती. मनोयात्रींच्या पोटात कशी आग पडलेली असते हे जवळून अनुभवलं आहे मी…म्हणूनच पहिल्यांदा मनोयात्रीला भेटतो तेव्हा त्यांना दाळभात नायतर बिस्किट पाण्याची व्यवस्था करतो.
जवळच असलेल्या माझ्या बॅगेतून पाण्याची बॉटल तीच्या हातात दिली अन् तिने सरळ बॉटल तीच्या पोत्याच्या गाठोड्यात टाकून दिली, अन् ती मार्गस्थ झाली.
अन् माझ्या काळजाचा ठोका चुकला तिचा फोटो घेण्याचं धाडस त्या गर्दीत नमलं होतं माझं ! स्वतः ला सावरता बार्शी स्थानकावरूनच बुलढाण्याच्या दिव्य सेवा प्रकल्पाच्या अशोक भाऊंना तिच्या अवस्थेबद्दल सांगितलं अन् अशोक भाऊनी धीर देत हिरवा कंदील दिला…
जवळपास एक पंधरा दिवसांच्या अंतराने…सोलापूरातून काही मनोयात्रीबद्दल कळलं होतं त्यापैकी तीन जणांना शोधण्यास यश आलं. रुग्णवाहिकेची तजवीज करून तीन मनोयात्रींना घेऊन बार्शीत दाखल झालो. तिच्या पुनर्वसनासाठी लागणारे लीगल पोलिस प्रोसेस करून तिला घेऊन बुलढाण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
वाटेत ती आरडाओरडा करत सुटली. दरवाजा आदळत बाहेर पडण्याचा नाहक प्रयत्न करत होती. थोड्या वेळाने ती शांत झाली अन् पाण्याच्या बॉटलकडे एकटक पाहत… पाण्याच्या बाटल्या कडे पाहून इशाऱ्याने ती पाणी मागू लागली. एका लिटरच्या पाण्याच्या शेवटच्या थेंबापर्यंत बॉटल तोंडातून काढली नाही. तितक्यात तिचं नाव विचारलं…नाव काय ? : मंगला ! पिलेल्या पाण्याची बॉटल बाजूला सारून ती शांतपणे प्रवासाला मार्गस्थ झाली…!
अंधारलेल्या वाटेत अशोक भाऊंच्या दिव्य प्रकाशाने यांचं जीवन उजळून निघेल…!
आतिश कविता लक्ष्मण
संभव फाउंडेशन, सोलापूर
९७६५०६५०९८