पुणे : मकरसंक्रांत हा सण संपूर्ण भारतात एक महत्त्वाचा सण म्हणून वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण रथसप्तमी पर्यंत सुवासिनी हळदीकुंकूचा मान देऊन वाण देतात आणि उत्साहात साजरी करतात.
मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांच्या संकल्पनेतून वारांगणासोबत हळदीकुंकू कार्यक्रम घेण्याचे हे दुसरे वर्ष आहे. रेड लाईट एरिया मधील महिलांना हळदीकुंकूचा मान सन्मान देऊन वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल पुढे केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मंथन फाउंडेशन च्या प्रकल्प व्यवस्थापक कविता सुरवसे ह्यांनी सर्वांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले . कार्यक्रमाचे विशेष म्हणजे महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ, ज्यूस बाटली सोबत वाण म्हणून कंडोम वाटप करून ,सामाजिक संदेश देण्यात आला. मंथन फाउंडेशन गेली अनेक वर्षे आरोग्य, एच.आय.व्ही/ एड्स, गुप्तरोग, टी.बी, असंसर्गजन्य रोग ( NCD) वर काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून कंडोम बद्दल जनजागृती करण्यासाठी कंडोमचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अंगणवाडी मुख्य सेविका मंजुषा अहिरराव आणि अंगणवाडी सेविका मेधा मुगळे उपस्थितीत होते. त्यांनी महिलांना संबोधन करताना महिला व त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारी योजनांची माहिती दिली.
महिलांना दिलेल्या मानाचा, सन्मानाचा त्यांनी आनंद व्यक्त केला. असा मान आम्हाला आजपर्यंत कोणीही दिले नाही असे मत व्यक्त करुन सर्व मंथन फाउंडेशन स्टाफचे त्यांनी आभार मानले. या कर्यक्रमाला महाराष्ट्र राज्य एड्स नियत्रंण संस्था, मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंण विभाग, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
हळदीकुंकू चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथन फाउंडेशनचे कार्यकर्ते सारिका पवार, श्रुतिका यादव, सुवर्णा पवार, सोनाली हांडे, बाबू शिंदे आणि पिअर ह्यांनी मेहनत घेतली.