पुणे : बाल हक्क कृती समिती (आर्क) तर्फे ३० एप्रिल राष्ट्रीय बालमजुरी विरोध दिन ते १२ जून राष्ट्रीय बालमजूरी विरोधी दिनापर्यंत बालमजुरी विरोधी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेची सुरवात बालगंधर्व पोलीस चौकी, संभाजी बाग परिसरामध्ये शासनाचे बालमजुरी विरोधात ऑनलाइन तक्रार करण्याचे पेन्सिल पोर्टल (pencil.gov.in) चे स्टिकर्स आणि पोस्टर्सचे उद्घाटन करून करण्यात आली. यानिमित्ताने बालहक्क कृती समितीच्या युवकांनी बालमजुरी विषयावर चित्रे काढली. तसेच सर्वसामान्य नागरिकांना पेन्सिल पोर्टलची माहिती दिली.
यावेळी आर्कचे सह संयोजक डॉ. विष्णू श्रीमंगले, कार्यकारी सदस्य अतुल भालेराव, सोनाली मोरे, कल्याणी दाभाडे, कामगार विभागाचे अधिकारी वंजारी, सूर्यवंशी, आर्क युवा लीडर अजय बनसोडे, विश्वाजा कुचेकर, दिव्या चव्हाण, विनोद गुंजवटे, समन्वयक सुशांत आशा उपस्थित होते.
सदर उपक्रमामध्ये डेक्कन परिसरामध्ये रस्त्यावर राहणारे काही बालके देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या बालकांनी शिक्षण, आरोग्य व जगण्याच्या संघर्षाबाबतची चित्रकलेतून कैफियत मांडली.
पुणे शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये ४४ दिवस हि मोहीम राबविण्यात येणार आहे. पेन्सिल पोर्टल बाबत जनजागृती हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असून पोस्टर्स, स्टिकर्स , पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
आर्क हे बाल हक्कांवर काम करणाऱ्या संस्थाचे व्यासपीठ आहे. बालमजूरी ही अनिष्ठ प्रथा असून बालमजुरीमूळे लाखो मुलांचे बालपण हरवले आहे. या प्रथेचे मुळासकट उच्चटन होणे आवश्यक आहे. ही बालहक्क कृती समितीची भूमिका आहे.