औरंगाबाद : छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त विवेक विचार मंच व सहयोगी संस्थेच्या वतीने सामाजिक न्याय परिषद उत्तम प्रतिसदासह संपन्न झाली. या परिषदेचे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी केले.
परिषदेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे प्रमुख उपस्थिती होती. मंचावर विवेक विचार मंचचे कार्यवाहक महेश पोहनेरकर व सामाजिक न्याय परिषदेचे स्वागताध्यक्ष दुष्यंत आठवले हे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील राधाजी दशरथराव शेळके व श्रीमती जिजाबाई राधाजी शेळके, परभणी; जन संघर्ष समिती, नागपूर; गिरीश चव्हाण, नगर या तीन सामाजिक संस्था /कार्यकर्त्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
परिषदेच्या पहिल्या मुख्य सत्राचे प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले तर आभार निखिल आठवले यांनी व्यक्त केले.या न्याय परिषदेला महाराष्ट्रातून सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते असे ३१० लोक उपस्थित राहिले.
सामाजिक न्याय परिषदेच्या दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील सामाजिक, जातीय अन्याय या अत्याचाराच्या व जातीय तणावाच्या घटनांच्या संदर्भात चर्चा, अनुभव कथन, पीडित व्यक्तींचे मनोगत व उपाययोजना या संदर्भात विस्तृत चर्चा झाली. अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे विचार मांडले. ऍड.संजीव देशपांडे यांनी ऍट्रोसिटी कायद्याची माहिती दिली व विवेक विचार मंच चे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी परिषदेचा समारोप केला.