समाजबंध आयोजित सत्याचे प्रयोग शिबीर यशस्वी पार पडले, यामध्ये १४ जिल्ह्यातील एकूण ५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. भामरागड मधील १७ गावांमध्ये हे प्रयोग करण्यात आले. या मध्ये मासिक पाळी विषयी संवाद सत्र, कापडी पॅड वाटप तसेच कापडी आशा पॅड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
१. ऊन्हाळा(४५℃)
भामरागड या भागात पाऊस खूप होतो त्यामुळे पावसाळ्यात बऱ्याच गावांचा नदीच्या पुरामुळे संपर्क तुटतो. याउलट बरोबर उन्हाळा आहे तिकडे तुम्ही जर गाडीवरून जात असाल तर रुमाल ओला करून तो तोंडाला बांधा गाडी १km जाते तोपर्यंत तो रुमाल सुकला असेल (हा अनुभव आहे). उन्हाळा प्रचंड आहे. आणि अशा उन्हात गुण्यागोविंदाने राहणारे आदिवासी लोक तिथल्या पर्यावरणाशी जुळवून घेतात हे सत्य मला समजले.
२. जंगल आणि रस्ते
भामरागड तालुका हा फक्त आणि फक्त निसर्गाचे दर्शन घडवितो. रस्त्यावरून जाताना किड्यांचे आवाज आणि वाऱ्याची झुळूक हे शहरातील वाहतुकीला आणि गाड्यांच्या आवाजाला नक्कीच भारी पडतील. प्रत्येक गावात जाणारा रस्ता ही एक पायवाटचं असे असून देखील आणि So Called सोयी सुविधा नसलेल्या ठिकाणी आदिवासी लोक आपले जीवन पर्यावरणपूरक आणि निसर्गरम्य जगत आहेत. हे खूप प्रोत्साहन देणारे आहे.
३. जीवनशैली
आदिवासी लोकांची जीवनशैली खूप साधी सरळ आहे. कोणीही विनाकारण धावपळ करताना दिसत नाही. मोहाचा सिझन चालू असल्यामुळे सकाळी ४ ला गावातील सर्व लोक मोहाची फुलं वेचायला जातात आणि दुपारी किंवा संध्याकाळी घरी येतात. कोणत्याही गोष्टीचा अट्टहास इथे दिसला नाही. आपल्या कामात सतत मग्न असणारी लोक इथं पाहायला मिळाली. कमीत कमी संसाधनात माणूस कसा जीवन जगू शकतो ही एक गोष्ट आदिवासी बांधवांकडून शिकण्यासारखी आहे.
४. आरोग्य
आदिवासी समाज हा पुर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे इथले आजार हे निसर्गातून उपलब्ध होतील त्याच उपचारावर बरे होतात. परंतु काही आजार बरे होतीलच असे नाही. सध्याच्या एकूणच जगाच्या आरोग्याची स्थिती बघता भामरागड मधील स्थिती ही काही वेगळी नाही. परंतु तिथल्या लोकांची प्रतिकारशक्ती कमालीची असल्याने त्यांना नव्या आजाराचं किंवा एकूणच आरोग्याचं एवढं कौतुक नाही. म्हणूनच आज ही तिथं ५ ते ७ हिमोग्लोबिन असणाऱ्या महिलेची नैसर्गिक प्रसूती होते. कुटुंब नियोजनचा अभाव आहे त्यामुळे एका स्त्रीला ४-५ मुलं असणं ही सामान्य स्थिती आहे. एकंदरीत स्त्रीच्या आरोग्याबाबतीत दिसलेलं सत्य हे खूपच विदारक आहे.
५. मासिक पाळी (कुर्मा)
मासिक पाळीला आदिवासी लोक कुर्मा म्हणतात. कुर्मामध्ये असणाऱ्या महिलेला एका झोपडीत राहावे लागते. ती झोपडी गावाच्या किंवा टोल्याच्या बाजूला असते. ही झोपडी आकाराने खूपच लहान असते. जेमतेम महिला झोपू शकतील अशी तिची लांबी-रुंदी असते. तिथं ५ दिवस पाळीतील महिला राहते हे फार अमानवी असं आहे. पाळीतील स्त्रीला मानसिक स्थैर्य तसेच शारीरिक आराम हा गरजेचा असतो परंतु या कुर्मा घरात तिला ते मिळत असेल यात शंकाच आहे. अदिवासी परंपरा आणि संस्कृतीकडून शिकण्यासारख्या गोष्टी खुप आहेत परंतु परंपरेच्या नावाखाली अशी एक अमानवी आणि स्त्रीला अस्पृश्य समजणारी कुर्मा प्रथा अदिवासी महिला पाळतात हे सत्य कुठं तरी मनाला हेलावून टाकणार आहे. बऱ्याच स्त्रियांना किंबहुना पुरुषांना देखील ही प्रथा नसावी असे वाटते. परंतु काही ठराविक स्वयंघोषित परंपरेचे वारस त्यांना बंड करण्यापासून रोखत आहेत व त्यांच्या भीतीमुळे बरेच लोक अजून ही परंपरेच्या गुलामगिरी -मध्ये असल्याचे प्रकर्षांने जाणवते. ही प्रथा पुढे चालू ठेवायची की नाही हा सर्वस्वी अधिकार आदिवासी लोकांचा आहे परंतु अशा कुप्रथांमुळे जर एखाद्या माणसाचा जीव जात असेल तर निसर्गपूजक आदिवासी बांधवाना ते अमान्य असावं कारण माणूस ही निसर्गानेच बनवलेली सुंदर कलाकृती आहे जी विचार करू शकते आणि त्या विचारानुसार वागू शकते. सर्व आदिवासी बांधवांनी सद्सद्विवेकाने विचार केला तर या प्रथा फार काळ टिकणार नाहीत व माणसातील मागासलेपण जाऊन माणूसपण यायला वेळ लागणार नाही.
वैभव शोभा महादेव
समाजबंध