प्रिय बाबासाहेब…
सप्रेम जय भीम, जय संविधान..!!
कसे आहात? काय चाललंय बाकी? आज पत्राच्या निमित्ताने तुमच्याशी बोलता येतंय. इतर वेळेस आपल्या भवतालच्या आणि जगभरातल्या घडामोडी बघायच्या आणि मनाच्या संवेदनशीलतेनुसार त्यावर व्यक्त व्हायचं एवढंच काम आतापर्यंत करत आलो. आता ज्या गोष्टी बघितल्या त्याच तुमच्यापर्यंत पोचवतोय.
आजही तुमच्या संघर्षाची बाराखडी गिरवणारे हजारो भीमराव मला समाजात दिसतायत. तुम्ही त्या काळी मंदिर प्रवेश, चवदार तळे सत्याग्रह आणि संविधाननिर्मितीच्या महत्त्वाच्या कामात योगदान दिलं नसतं तर तुम्हाला आपलं मानणाऱ्या समाजाचे आज काय हाल झाले असते त्याचा विचार करवत नाही. तुम्ही हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर तुम्हाला वाळीत टाकलेले लाखो लोक आपल्या देशात आहेत बरं का..!! तुमचा, तुमच्या अनुयायांनी स्वीकारलेल्या निळ्या झेंड्यांचा आणि जयभीम नाऱ्याचा ते गर्वाने धिक्कार करत असतात. असो, त्यांच्या मनातील द्वेषालाही पुरून उरेल अशी संविधानाची देण तुम्ही देशाला देऊन ठेवलीय याच आशेवर अनेक गोष्टी स्वीकारणं आजकाल सोपं जातंय.
अवहेलनांनी भरलेलं तुमचं आयुष्य पाहिलं की तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव होते. १२ आणि १८ तास अभ्यास या गोष्टी मोबाईलच्या नोटिफिकेशनची बीप वाजल्यानंतर न बघता करायच्या असतात याची जाणीवच आमच्या पिढीला आता नाही. शाळा-कॉलेजमध्ये शिकवलं जातंय तेवढं शिकायचं, गडगंज पगाराची नोकरी आणि सोज्वळ छोकरी बघून मोकळं व्हायचं हा इथल्या तरुणाईचा प्राधान्यक्रम झाला आहे. गरिबांसाठी लढणारा आंबेडकरवादी ही ओळख झोपडपट्टी आणि कष्टकरी वस्त्यांमध्ये ठळकपणे जाणवून येते.
बाबा, खरं सांगू – तुझ्या लोकांना आजही इथली सवर्ण लोकं तितक्या मोकळेपणाने स्वीकारत नाहीत रे..!! तो/ती आपल्यातला आहे का? हा ठरलेला प्रश्न ऐकायला मिळतोच. तुझी ओळख महामानव, दलित उद्धारक अशी करून देताना बाबासाहेब हे देशातल्या सगळ्यांचेच होते, आहेत हे सोयीस्कररित्या विसरलं जातं. राजकारणासाठीची व्होट बँक म्हणून मात्र तुझ्या नावाचे शिक्के लावलेले लोक आपोआपच पुढे येतात. अशोकचक्र किंवा निळा झेंडा दिसला की नाकं मुरडणारे अपल्यातलेच काही लोक पाहिलं की त्यांना माणूस म्हणायचीही लाज वाटते बग भीमा..!!
भारत हे जातीय अत्याचारांचं आगार बनायचं नसेल तर आज देशातील सगळ्याच राजकारण्यांना तुझ्या विचारांवर चालावं लागणार आहे. पण हे केलं तर राजकारण कसं करणार? या विचारानेच सगळा घोळ घातला आहे. जातीय आणि धार्मिक दंगली घडवणाऱ्या अनेक राजकारण्यांना, सरकारांना जाब विचारण्याची धमक तू निर्माण केलेल्या संविधानाने दिलीय बघ..!! निराशेचे मळभ कितीही दाटले तरी तुझा संघर्षाचा वारसा जपणारे लोकही अस्तित्वात आहेत बरं का..शाहिरी, लोककला, साहित्य माध्यमातून तू दिलेले विचार हे लोक तळमळीने इतर समाजापर्यंत पोचवतायत. काही लोक रस्त्यावरच्या लढाईतसुद्धा प्राणपणाने लढताना दिसतायत. तुझ्या प्रेरणेनेच करोडो नागरिकांची पहिली पिढी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याचं पहायला मिळतंय. तुला प्रेरणास्त्रोत मानून देश-विदेशात शिक्षणासाठी जाणारी पिढीही आता उघड्या डोळ्यांनी पाहता येतीय. हा आनंद मोठाच आहे.
महात्मा गांधींना तू तुझ्या बुद्धीने आणि लढण्याच्या वृत्तीने थक्क केलं होतंस तर जवाहरलाल नेहरूंनाही देशाच्या नियमांची चौकट आखू शकेल असा शिल्पकार तुझ्यातच दिसत होता. माणसांना मापात ठेवता आलं पाहिजे, त्यांना डोक्यावर घेताना त्यांनी दिलेले विचार पायदळी तुडवले जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असं महापुरुषांच्या बाबतीत नेहमी सांगितलं जातं. हे समजायला मात्र अजून काही काळ जावा लागेल एवढं नक्की..!! सामाजिक समतेचा आणि बंधुतेचा विचार रुजण्यासाठी संविधानाच्या रुजवणुकीची सर्वांत जास्त गरज आज निर्माण झालीय. तुझे अनेक साथीदार हा लढा प्राणपणाने लढतायत. अविचारी शक्तींना विचाराने आणि कृतीने उत्तर देतायत.. याची प्रेरणा फक्त तूच आहेस भीमा..
जन्मभर पुरेल एवढी प्रेरणा दिल्याबद्दल तुझं उपकार विसरता न येणारंच आहेत..म्हणूनच लोकही म्हणतायत – “माय बापाहुन भिमाचं उपकार लय हाय रं, आम्ही खातू त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!!
थँक्स बाबा..!!
तुझाच
एक लेकरू
-योगेश नंदा